भूल न देता केली मोतीबिंदू शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

सोळा वर्षांपूर्वी प्रथमच नॉन फेकोतंत्र वापरून डॉ. नानासाहेब खरे यांनी नाशिकमध्ये शस्त्रक्रिया करून दाखविली. पन्नासवर्षीय श्रीमती खाडिलकर यांच्यावर भुलीचे इंजेक्‍शन न देता बिनटाक्‍याची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरीत्या केली. या शस्त्रक्रियेदरम्यानचा अनुभव सांगताहेत, सुजय नेत्रसेवा, फेको ऍण्ड लॅसिक लेसर सेंटरचे संचालक डॉ. नानासाहेब खरे...

खासगी प्रॅक्‍टिसला 5 एप्रिल 2000 ला सुरवात केली. साधारणत: महिनाभरानंतर लगेचच मे महिन्यात कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथील पन्नासवर्षीय श्रीमती खाडिलकर यांच्यावर बिनटाक्‍याची व भुलीचे इंजेक्‍शन न देता शस्त्रक्रिया केली. वैद्यकीय शिक्षण घेताना केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेत अन्य सहाय्यकांचे पाठबळ मिळत असे. पण स्वतः शस्त्रक्रिया करताना सर्व आपल्यालाच करायचे असल्याने थोडे दडपण होतेच. पण अनेक वर्षे अंधारमय जीवन जगणाऱ्या रुग्णाला नवी दृष्टी देण्यात मिळणाऱ्या आनंदासाठी शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान स्वीकारले.

नगरनंतर नाशिकमध्ये प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेपासून आजवर केलेल्या सर्वच शस्त्रक्रियांमध्ये डॉ. सुनीता खरे यांचे सहाय्य लाभल्याचे आवर्जून नमूद करू इच्छितो. श्रीमती खाडिलकर यांच्यावरील केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेपासून आजवर केलेल्या प्रत्येक शस्त्रक्रियेचा अनुभव अविस्मरणीय आहे. दृष्टी हा विषय भावनांशी जोडलेला आहे. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या भावनिक प्रतिक्रिया ऊर्जा देणाऱ्या ठरतात. दृष्टी प्राप्त झाल्यानंतर रुग्णाच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आजही शब्दांत व्यक्‍त करण्यासारखा नाही.

(शब्दांकन : अरुण मलाणी)

Web Title: cataract surgery

टॅग्स