लोकसहभागातून बसविले सीसीटीव्ही कॅमेरे

cctv
cctv

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गावात होणाऱ्या चोऱ्या व अघटीत घटना रोखण्यासाठी येथील पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावातील मुख्य बजारपेठेसह गावात "सीसीटीव्ही' बसविण्याचे विधायक काम हाती घेतले आहे. येथील सहायक निरीक्षक जयपाल हिरे यांच्या संकल्पनेमुळे हा उपक्रम राबविण्यात आला असून यामुळे पोलिसांचा चोरट्यांवर "वॉच' राहणार आहे. एखाद्या खेडेगावात "सीसीटीव्ही कॅमेरे' बसविण्याचा जळगाव जिल्ह्यात हा पहिलाच उपक्रम ठरला आहे. 

येथील पोलिस ठाण्याला "आयएसओ' मानांकन प्राप्त असुन या पोलिस ठाण्यांतर्गत 55 खेडी आहेत. येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी गावातील गुन्हेगारी कमी होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी लोकसहभागातून मोठ्या संख्येने असलेल्या सायगाव, टाकळी प्र.दे. व मेहुणबारे या तिन्ही गावांपैकी सध्या मेहुणबारेत "सीसीटीव्ही' बसविण्याचे काम हाती घेतले आहे. यापुर्वी सायगाव व टाकळी प्र.दे. या गावातही "सीसीटीव्ही' बसविले आहेत. 

लोकसहभागातुन उभारला पैसा 
जयपाल हिरे यांनी "सीसीटीव्ही' बसविण्यासाठी स्वतः वेळ काढून ग्रामस्थांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. "सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे काय फायदा होईल, हे ग्रामस्थांना पटवून दिले. तीन महिन्यांपासून या उपक्रमात त्यांनी लोकसहभाग वाढवला. त्यासाठी श्री. हिरे हे स्वतः तिन्ही गावांमध्ये फिरले व त्यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. ज्यात सायगाव व टाकळी प्र.दे. या दोन्ही गावांतून प्रत्येकी साडेतीन लाख रुपये तर मेहुणबारे गावातून सव्वा चार लाख असा एकूण 11 लाख 25 हजारांचा निधी उभा केला. त्यामुळे ही तिन्ही गावे आता "सीसीटीव्ही'त कैद होणार आहेत. या उपक्रमासाठी त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी नजीर शेख यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे हिरे यांनी सांगितले. 

पोलिसांची राहणार नजर 
या तिन्ही गावांपैकी टाकळी व सायगावमध्ये "सीसीटीव्ही कॅमेरे' बसविण्यात आले असून मेहुणबारे सध्या बसविण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. या तिन्ही गावातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी मेहुणबारे पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी सायगावला दोन घरफोड्या झाल्या होत्या. या ठिकाणी "सीसीटीव्ही कॅमेरे' राहिले असते तर चोरटे लवकर पकडले गेले असते किंवा चोरी देखील झाली नसती असेही श्री. हिरे यांनी सांगितले. त्यामुळे या तिन्ही गावातील बाहेर पडण्याचे जेवढे छोटे मोठे रस्ते आहेत. हे सर्व "सीसीटीव्ही'च्या निगराणीत राहतील. 

सावधान कॅमेरा तोडला तर... 
गावांमध्ये बसविलेल्या "सीसीटीव्ही'त कोणी काही खोडी किंवा ते फोडण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामपंचायतीत एक मोठ्या आवाजाचा भोंगा (सायरन) राहणार आहे, त्याचा आवाज कोणीही काही केल्यास लगेच मोठ्याने वाजू लागेल. त्यामुळे "सीसीटीव्ही'त कुठलीच खोडी कोणाला करता येणार नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. 

नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे. "सीसीटीव्ही कॅमेरा' हे आम्हा पोलिसांना अनेक गुन्ह्यात मोलाचे ठरत आले आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रमुख बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये सध्या हा उपक्रम राबवला आहे. ग्रामस्थांच्या मदतीने व पोलिस ठाण्यातील सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने हे शक्‍य झाले आहे.
- जयपाल हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता.चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com