आषाढीनिमित्त सटाणा ते मुंजवाड दिंडी अपूर्व उत्साहात

To celebrate the festival of Ashadhi, from the Satana to Munanjwar Dindi
To celebrate the festival of Ashadhi, from the Satana to Munanjwar Dindi

सटाणा : 'विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल' च्या जयघोषात श्री क्षेत्र मुंजवाड (ता.बागलाण) येथील श्री विठ्ठल मंदिर देवस्थान व येथील संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे यंदाही आज सोमवार (ता.23) रोजी आषाढी एकादशीनिमित्त सटाणा ते मुंजवाड पायी पालखी दिंडी सोहळा हजारो भक्तांच्या मांदियाळीत अपूर्व उत्साहात साजरा झाला. पंढरपुर वारीच्या आसप्रमाणेच तालुक्यातील जनतेला दरवर्षी टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि हरिनामाच्या गजरात या पायी दिंडीत सहभागी होण्याची प्रतिक्षा असते.

आज सकाळी आठ वाजता येथील श्री. यशवंतराव महाराज मंदिरासमोर सटाणा बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांनी भगवा झेंडा दाखवीत पायी दिंडीचा प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनील मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, प्राचार्य दिलीप धोंडगे, नारायण सूर्यवंशी, मुंजवाडच्या सरपंच प्रमिला पवार, प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते. 

पहाटे पाच वाजता श्री क्षेत्र मुंजवाड येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या व वारकरी रतन अहिरे यांच्या सपत्नीक हस्ते अभिषेक व महापूजा झाली. सकाळी मुंजवाडचे ग्रामस्थ व वारकरी संप्रदायातर्फे येथील श्री यशवंतराव महाराज मंदिरापासून टाळ-मृदंगाचा गजर व विठ्ठलनामाचा जयघोषात दिंडी काढली. दिंडीत खमताणे (ता.बागलाण) येथील गुरुकुल इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल नंदी, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व चांगदेव दर्शन यांचा सादर केलेला सजीव देखावा हे दिंडीचे प्रमुख आकर्षण होते. दिंडीच्या अग्रभागी पांढऱ्या शुभ्र घोड्यावर पारंपारिक साडी परिधान करून स्वार झालेली चिमुकली, भालदार चोपदार तर मागे भगवे झेंडे घेवून विठूनामाचा गजर करणारे वारकरी व ग्रामस्थ असे दिंडीचे स्वरूप होते.

दिंडीत 800 हुन अधिक विद्यार्थी वारकऱयांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून काढलेली दिंडी विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गाद्वारे मुंजवाड कडे मार्गस्थ झाली. पायी दिंडीचे दर्शन घेण्यासाठी शहरवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी केली होती. मुंजवाड येथे दिंडीचे आगमन होताच विठ्ठल मंदिरात महाआरती झाली. यानंतर दुपारी निरपूर येथील पायी दिंडीचे आगमन झाले. यावेळी पंढरपूरच्या वारीप्रमाणे माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या रिंगणाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अश्वानी एक रिंगण पूर्ण केले. त्यानंतर त्याच ठिकाणी व माऊलींचेही उभे रिंगण पार पडले. माऊलींचे गोल रिंगण झाल्यानंतर शेवटी तुकोबांचे उभे रिंगण झाले. हे रिंगण सोहळे पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात वारकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते.

या सोहळ्यात गुरुकुलचे संस्थापक व प्राचार्य जितेंद्र आहेर, हरिकांत सूर्यवंशी, चंद्रकांत सोनवणे, लता जाधव, लोटन सूर्यवंशी, एन.डी.जाधव, खुशाल जाधव, तुकाराम जाधव, विश्वनाथ जाधव, विजय सूर्यवंशी, रमेश सोनवणे, तुकाराम जाधव, बाबुराव सोनवणे, मधुकर नंदाळे, राजेंद्र बच्छाव, कारभारी पवार, धर्मा जाधव, राकेश जाधव, गुलाब जाधव, महेश खैरनार आदींसह शेकडो ग्रामस्थ व भाविक सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com