Video : वारे व्वा...केंद्रीय पथकाकडून रस्त्यावरच शेतकऱ्यांची विचारपूस 

संजय पाटील
Friday, 22 November 2019

पारोळा ः अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय समिती दौऱ्यावर होती. ही समिती पाहणी दौरा करण्यासाठी काळ्याकुट्ट अंधारात पारोळा तालुक्‍यात धावता दौऱ्यावर आली होती. नावाने दौरा करत रस्त्यावरच शेतकऱ्यांची विचारपूस करत एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. 

पारोळा ः अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय समिती दौऱ्यावर होती. ही समिती पाहणी दौरा करण्यासाठी काळ्याकुट्ट अंधारात पारोळा तालुक्‍यात धावता दौऱ्यावर आली होती. नावाने दौरा करत रस्त्यावरच शेतकऱ्यांची विचारपूस करत एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. 

पारोळा तालुक्‍यात ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 114 गावामधील 52 हजार 729.66 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी आज (ता.22) दुपारी केंद्रीय पथक तालुक्‍यातील मोंढाळे प्र. अ., करंजी बु. व सावरखेड मराठ येथील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करणार होते. परंतु दुपारच्या पथक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दाखल झाले. त्यामुळे पथकाने रस्त्यावरच पाहणी केल्याने शेतकऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. केंद्रीय पथकात केंद्रीय अर्थ मंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दीनानाथ व जयपुर येथील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुभाष चंद्रा, नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपविभागीय कृषी व अधिकारी दादाराव जाधवर, प्रांतअधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, प्रभारी कृषी अधिकारी सुरेश खेताडे व कृषीसहाय्यक व मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते. 

Image may contain: 3 people

अंधाऱ्यातील अहवाल कोणाच्या हिताचा 
अतिवृष्टीने नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती सदस्यांनी सायंकाळच्या साडेसहाच्या सुमारास प्रत्यक्ष शेतात न जाता रस्त्यावरच पाच मिनीट शेतकऱ्यांची विचारपूस करत धावती भेट घेतली. यामुळे अंधाऱ्यातील नुकसानीचा अहवाल गुलदस्त्यात की शेतकरी हिताचा राहील? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यावेळी मोंढाळे प्र अ. येथील शेतकरी भाऊलाल विठ्ठल पाटील यांचे कपाशी शेताताचे नुकसान न पाहता केंद्रीय समितीने हिरमोड केला. दरम्यान नाशिक विभागीय आयुक्तांनी शेतकऱ्यांचे म्हणणे न ऐकता केंद्रीय समितीची बाजू घेतल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

करंजी व सावरखेड येथील शेतकरी रस्त्यावरच 
केंद्रीय पथक येणार यासाठी दुपारपासूनच शेतकरी पथकाची वाट पाहत बसली होती. परंतु धावती भेट घेणारे पथकाने करंजी व सावरखेड मराठ येथे पाहणी न करता निघून गेल्याने दोघही गावातील शेतकरी रस्त्यावरच थांबत वाट पाहत बसली. पाहणी दरम्यान केंद्रीय पथक हे आपल्या आठ ते दहा गाड्यांच्या ताफा घेऊन आले. सुटाबुटात आलेले अधिकारी यांनी नावाला एकच प्रातिनिधिक स्वरूपात म्हणणे ऐकून महामार्गावर काढता पाय घेतला. अनेक शेतकऱ्यांना आपल्या व्यथा मांडायच्या होत्या. परंतु या पथकाने लक्ष दिले नाही. यावेळी मोंढाळे प्र. अ. सरपंच महारु पाटोळे, नंदलाल पाटील, सुधाकर पाटील, बळिराम पाटील, सतीश पाटील, किशोर पाटील, नंदू पाटील, विठ्ठल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. 

केंद्रीय पथकाने शेतात जाऊन पाहणी न करता रस्त्यावरच विचारपूस केल्याने हा एक प्रकारे थट्टाच केली. सुटाबुटातील हे पथक नेमका कसा अहवाल देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. 
- सुधाकर पाटील, शेतकरी मोंढाळे प्र. अ. 

दुपारची पाहणी पथकाने सायंकाळी रस्त्यावरच केल्याने पथकाने शेतकऱ्यांचा अपमानच केला आहे. शेतकऱ्यांची दखल न घेता महामार्गावर काढता पाय काढणारे पथकाचा संघटना निषेध व्यक्त करीत आहे. 

- जितेंद्र पाटील, कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central camity visit jalgaon district farmer