धुळ्यासह जिल्ह्यात ३१ ला ‘चक्का जाम’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

विविध मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर

धुळे - कोपर्डी घटनेतील अत्याचाऱ्यांना फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभर लाखोंचे मोर्चे काढल्यानंतरही शासनाने मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या प्रश्‍नी पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३१ जानेवारीला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन होणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी हे आंदोलन होईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे दिली.

विविध मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर

धुळे - कोपर्डी घटनेतील अत्याचाऱ्यांना फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभर लाखोंचे मोर्चे काढल्यानंतरही शासनाने मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या प्रश्‍नी पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३१ जानेवारीला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन होणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी हे आंदोलन होईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे दिली.

मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, साहेबराव देसाई, प्रकाश पाटील, डॉ. संजय पाटील आदींनी चक्का जामबाबत दुपारी साडेचारला येथील व्यंकटेश लॉनमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोपर्डी प्रकरणातील मराठा समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील घटनेतील नराधमांना तत्काळ फाशी द्यावी, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना शिक्षेची व दंडाची तरतूद करावी व संबंधितांना या कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या सवलती बंद कराव्यात, मराठा समाज आरक्षणाची बाब न्यायप्रविष्ट असली तरी शासनाने भक्कमपणे बाजू मांडून आरक्षण मिळवून द्यावे; तसेच त्यासाठी केंद्र व राज्याच्या कायद्यात आवश्‍यक तरतूद व दुरुस्ती करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याऐवजी तेथे संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा, बाबासाहेब पुरंदरे याचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार परत घ्यावा, आदी मागण्या आहेत.

प्रतिमोर्चांना खतपाणी
लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतरही शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. याउलट प्रतिमोर्चांना खतपाणी घालण्याचे प्रकार दिसून येत आहेत. प्रतिमोर्चांमधील मागण्या सोडविण्यास सरकार पुढाकार घेत असताना मराठा समाजाच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. ही बाब मराठा समाजाच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणारी आहे.

धुळ्यासह जिल्ह्यात ‘चक्का जाम’
३१ जानेवारीला मुंबईत महामोर्चा होता. मात्र, सध्या राज्यात ठिकठिकाणी आचारसंहिता लागू असल्याने मोर्चा पुढे ढकलून त्याऐवजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन होईल. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांच्या ठिकाणी व मोठ्या गावांमध्ये तेथील मराठा समाज रस्त्यावर उतरेल. धुळे ग्रामीण व धुळे शहराचा चक्काजाम सकाळी साडेदहाला हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ करण्यात येईल. प्रवासी, वाहनधारक अथवा कुणालाही त्रास होणार नाही. उलट प्रवाशांना पिण्याचे पाणी व इतर अत्यावश्‍यक सुविधा पुरविल्या जातील. पत्रकार परिषदेला हरिश्‍चंद्र वाघ, राजेश इंगळे, राहुल गायकवाड, वामन मोहिते, ज्ञानेश्‍वर पाटील, सुधाकर बेंद्रे, प्रा. बी. ए. पाटील, सुधीर मोरे, सुभाष पाटील, नाना कदम, हेमंत भडक, सुलभा कुवर, संजय बगदे आदी उपस्थित होते.

शांततेचा अंत पाहू नये
मराठा समाजाने आतापर्यंतची आंदोलने शांततेच्या मार्गाने काढली आहेत. मात्र, या शांततेचा शासनाने अंत पाहू नये. प्रसंगी कायदा हातात घेण्याची वेळ आली तर तेही करू व त्याची जबाबदारी शासन, प्रशासनाची असेल असे मोरे व अन्य पदाधिकारी म्हणाले.

Web Title: chakka jam for maratha society reservation