धनगर समाजाकडून चक्काजाम, भजने गात आरक्षणाची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

धनगर समाजाकडून आरक्षण व प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आले आहे. साक्री येथे धनगर समाज संघर्ष समितीतर्फे जिल्हाध्यक्ष रमेश सरक यांच्या नेतृत्वात महामार्गावर पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमा पूजनानंतर चक्काजाम आंदोलन झाले.

धुळे - आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी धनगर समाज संघटनांनी साक्री, कुसुंबा येथे चक्काजाम आंदोलन केले. तर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भजने गात सरकार, प्रशासनाचे लक्ष वेधले. धुळे ग्रामीणमधील कॉंग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनीही टाळ हातात घेत भजनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. 

धनगर समाजाकडून आरक्षण व प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आले आहे. साक्री येथे धनगर समाज संघर्ष समितीतर्फे जिल्हाध्यक्ष रमेश सरक यांच्या नेतृत्वात महामार्गावर पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमा पूजनानंतर चक्काजाम आंदोलन झाले.

कुसुंबा येथे महामार्गावर धनगर समाजाने चक्काजाम आंदोलन केले. धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष पंडित मदने, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बापूराव पवार, जिल्हा सरचिटणीस रितेश परदेशी, जिजाबाई धनगर, मीराबाई धनगर, सुमित्रा परदेशी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. या आंदोलकांमुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली.

सरकारविरोधात घोषणाबाजीतून परिसर दणाणून सोडला. निजामपूर- जैताणे येथेही रास्ता रोको आंदोलन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ राज्य धनगर समाजोन्नती मंडळाच्या जिल्हा शाखेने एकदिवसीय धरणे आंदोलन केले. टाळमृदंगाच्या गजरात भजने गात आरक्षणासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. मंडळाचे जिल्हाध्यक्ष आनंदा देवरे, शेकडो समाजबांधवांसह आमदार कुणाल पाटील सहभागी झाले. जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनांमधून धनगर समाज मोठ्या प्रमाणावर एकवटल्याचे दिसून आले. 
सत्तेत येताच धनगर समाजाला तत्काळ आरक्षण लागू करू, असे दिलेले वचन भाजपप्रणीत सरकारने अद्याप पाळले नाही. हे वचन तत्काळ पूर्ण करावे. तसेच वीस मेंढ्यांमागे किमान पाच एकर वन चराई क्षेत्र उपलब्ध करावे, सोलापूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकरांचे द्यावे, शेळ्या- मेंढ्यांची निर्यात सुरू करावी, धनगर जमातीच्या उन्नतीसाठी कमिशनची स्थापना करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. 

Web Title: Chakkajaam at sakri kusumba for dhangar reservation