चाळीसगाव- भोरसला दुभत्या चार गायी दगावल्या 

दीपक कच्छवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

आम्ही गुरांच्या लसींची  शासनाकडे यापूर्वीच मागणी केली आहे.परंतु शासनाकडून वेळेवर लसी मिळाल्या नाहीत.  लाळ खुरकत आजाराची लागण झालेल्या भागात  लवकरच गुरांना लसीकरण करण्यात येईल
-ए.टी.सपकाळे  (पशुवैयकीय अधिकारी भोरस ता.चाळीसगाव)

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : भोरस (ता.चाळीसगाव) येथे दुधाळ जनावरांना 'लाळ खुरकूत' रोगाची लागण होऊन दिवसभरात एकाच शेतकऱ्याच्या चार गायी दगावल्या. या प्रकारामुळे पशुपालकांमध्ये भीती पसरली आहे. प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. भोरस (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी संभाजी पाटील यांच्याकडे 13 दुभत्या गायी आहेत. या गायींना "लाळ खुरकूत' आजाराची लागण झाली. त्यात काल (22 मार्च) दिवसभरात त्यांच्या चार गायी दगावल्या. दुसऱ्या पाच गायी व तीन वासरींनाही रोगाची लागण झाल्याचे संभाजी पाटील यांनी सांगितले. रोगाची लागण झालेली गुरे चांगल्या गुरांपासून त्यांनी दूर अंतरावर बांधली आहेत. या भागात इतरही शेतकऱ्यांच्या गुरांना लागण होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

दवाखान्यात लसींचा अभाव 
प्रत्यक्ष गावात जाऊन प्रस्तुत प्रतिनिधीनी माहिती जाणून घेतली असता, पशुवैद्यकीय दवाखान्यात 'लाळ खुरकूत'च्या लसी बुधवारपर्यंत उपलब्ध नव्हत्या. शिवाय यापूर्वी गुरांना प्रतिबंधात्मक लसी दिलेल्या नव्हत्या. एकाचवेळी चार गायी दगावल्याने प्रशासनाने आता तरी या लसी उपलब्ध करून द्याव्यात. गावातील इतर शेतकऱ्यांच्या गुरांना रोगाची लागण होणार नाही, यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. 

लाळ खुरकूत रोगाची लक्षणे 
लाळ खुरकूत हा आजार लहान व मोठ्या गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांना होतो. यात ताप येणे, लाळ गळणे, तोंडात व जिभेवर चट्टे पडणे, शिंगे व खूर गरम होणे, पायांच्या दोन्ही नखांमधील जागेत फोड येऊन ते फुटणे व जनावर लंगडू लागणे आदी प्रकारची लक्षणे आढळून येतात. या रोगात त्वरित उपचार न झाल्यास, जनावरे दगावण्याची शक्‍यता असते. 

भोरस गावातील गुरांची संख्या 
पशुधन संख्या 
गायी ............... 1088 
म्हशी ............... 285 
शेळ्या .............. 518 
डुकरे ................ 44 
------------------------------ 
एकूण ............... 3304 
------------------------------ 
 

Web Title: chalisgaon bhoras news 4 cow found dead