अफवा बिबट्याची, निघाला बैल!

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

हॉटेलमागे पिलखोड येथील रहिवासी पिंटू पाटील यांची शेती आहे. त्यांच्या बैलाला घशाचा आजार असल्याने त्याचा हंबरण्याचा आवाज बिबट्याप्रमाणेच भासतो. ज्यावेळी वन विभागाने त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. नेमके शेतकऱ्यांनी याच बैलाचा आवाज ऐकला आणि बिबट्या असल्याची अफवा गावभर पसरली. मात्र, अफवेमुळे अधिकाऱ्यांची मोठी फसगत झाली.

पिलखोड(ता. चाळीसगाव) - काही दिवसांपासून बंद असलेल्या बिबट्याच्या चर्चेला काल(ता. 17) पुन्हा एकदा उधाण आले होते. येथील चाळीसगाव रस्त्यावरील एक जुन्या हॉटेलच्या परिसरात बिबट्या असल्याची अफवा पसरली. मात्र 'बिबट्या' ऐवजी 'बैल' निघाल्याने वन विभागाची फसगत झाली.

काल(ता. 17) दुपारच्या सुमारास चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील बंद असलेल्या मंगलमूर्ती हॉटेलमागच्या शेतात बिबट्या असल्याची बातमी पसरली. काही शेतकऱ्यांनी या भागात बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज ऐकला. तत्काळ शेतकऱ्यांनी त्याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर घटनास्थळी तहसीलदार कैलास देवरे, वनरक्षक प्रकाश पाटील यांच्यासह वन कर्मचारी दाखल झाले. 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या भागात पाहणी केली असता. पाहणीदरम्यान तो बिबट्या नसून बैल असल्याचे उघड झाले. तो गुरगुरण्याचा आवाज हा बैलाचा होता. त्यामुळे नागरिकांनी कुठलिही भीती बाळगू नये, असे तहसीलदार कैलास देवरे यांनी सांगितले.

'तो' बैलाचा आवाज...

हॉटेलमागे पिलखोड येथील रहिवासी पिंटू पाटील यांची शेती आहे. त्यांच्या बैलाला घशाचा आजार असल्याने त्याचा हंबरण्याचा आवाज बिबट्याप्रमाणेच भासतो. ज्यावेळी वन विभागाने त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. नेमके शेतकऱ्यांनी याच बैलाचा आवाज ऐकला आणि बिबट्या असल्याची अफवा गावभर पसरली. मात्र, अफवेमुळे अधिकाऱ्यांची मोठी फसगत झाली.

Web Title: chalisgaon news: leopard