sugarcane-field
sugarcane-field

चाळीसगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले

पिलखोड - तालुक्यात मागील वर्षांच्या तुलनेत यंदा ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, उसाचे आगार ओळखल्या जाणाऱ्या गिरणा काठावरील काही गावांमध्ये उसाची कमी अधिक प्रमाणात लागवड झाल्याचे दिसून येत आहे. काही भागातील उसावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. अशा परिस्थितीत हक्काचा बेलगंगा सहकारी साखर कारखाना केव्हा सुरू होतो, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील ऊस लागवडीसंदर्भात कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षांच्या काळात गिरणा काठच्या गावांमध्ये ऊस लागवडीबद्दल तफावत दिसून येत आहे. तालुक्यात मागीलवर्षी उसाचे क्षेत्र घटले होते. मात्र, यंदा चांगली वाढ झाली आहे. गिरणा व मन्याड धरणातील पाण्यामुळे यंदा उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

'265' वाणाला पसंती...

तालुक्यातील पिलखोडसह, सायगाव, मांदुर्णे, उपखेड, तामसवाडी, नांद्रा, काकळणे, देशमुखवाडी, अलवाडी, शिरसगाव, टाकळी प्र. दे., वरखेडे, तिरपोळे, मेहुणबारे, उंबरखेड, पिंपळवाड म्हाळसा, जामदा, कृष्णापुरी तांडा, दरेगाव, लोंढे, चिंचगव्हाण, दहीवद, दसेगाव, वडगाव लांबे यांसह इतरही काही गावांत उसाची लागवड झाली आहे. यातील पिलखोड व सायगावला मात्र यंदा उसाचे क्षेत्र घटले आहे. तर मांदुर्णे व मेहुणबारे भागात गत वर्षापेक्षा यंदा ऊस लागवडीत वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांची उसाच्या 265 वाणाला अधिक पसंती दिसत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी याच वाणाचे बेणे आपल्या शेतात लागवड केले आहे. याशिवाय काही तुरळक भागात 86032 हा वाण पाहायला मिळतो. पुर्वी 8014 हे वाण अधिक दिसायचे. मात्र, काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी त्याची लागवड करणे पुर्णतः बंद केले आहे. 

चाऱ्यासाठीही उसाला पसंती....

परिसरात बहुतांश शेतकरी आपला उस चाऱ्यासाठी देत असतात. साखर कारखान्याला देण्यापेक्षा चाऱ्यासाठी तीन वेळा तोड केली जाते. शिवाय चाऱ्याला चांगला भावही मिळत असल्याने बरेच शेतकरी चाऱ्यासाठी ऊस विकताना दिसतात. पशुपालकांकडूनही उसाच्या चाऱ्याला प्रचंड मागणी असते.

बंद 'बेलगंगा'चा इफेक्ट!

अनेक वर्षांपासून बंद असलेल्या हक्काच्या बेलगंगा कारखान्यामुळेही परिसरातल्या उस उत्पादनावर परिणाम झाल्याचे वास्तव आहे. कारण बाहेरच्या कारखान्याला आपल्या भागातल्या उसाला कमी भाव दिला मिळतो. शिवाय अनेकदा उस तोडणीसाठी शेतकऱ्यांना विणवण्या कराव्या लागतात. त्याशिवाय उसाचे पेमेंट वेळेवर मिळत नाही. 


तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचा असलेला बेलगंगा साखर कारखाना जिल्हा बँकेच्या लिलाव प्रक्रियेतून खरेदी करणाऱ्या अंबाजी कंपनीकडून सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे कारखान्याचा पुन्हा पूर्वीसारखा धूर निघावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे हा कारखाना कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उसावर रोगाचा प्रादुर्भाव....

पावसाने दिलेला ताण व वाढते तापमान यामुळे उसावर काही वर्षापांसून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.  पायरीला, पांढरी माशी व लोकरी मावा यासारख्या काही रोगांची लागण उसावर होत आहे. ज्यामुळे पिकाची वाढ खुंटत असून पाने सुकायला लागतात. परिणामी त्याचा थेट परिणाम उत्पादनावर दिसून येतो. यासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

2 हजार 800 हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट...

तालुक्यात 2016-17 मध्ये 618 हेक्टर एवढे उसाचे क्षेत्र होते. यावर्षी कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा ऊस लागवडीचा 2 हजार 800 हेक्टर उद्दिष्ट आहे. त्यापैकी 2 हजार 624 हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. सध्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने यंदाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा आशावाद कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

शेतकरी म्हणतात....

आपल्या भागात काही वर्षापांसून होत असलेले असमाधारकारक पर्जन्यमान व रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. 

- सचिन अनंतराव पाटील, शेतकरी, पिलखोड.

 दिवसेंदिवस वाढते मजुरी दर यामुळे आगामी काळात उसाचे क्षेत्र वाढु शकेल.

- शाम गंगाधर माळी, शेतकरी, पिलखोड.

गतवर्षाच्या तुलनेने यंदा धरणाच्या पाण्यामुळे तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.

- आर.एस. राजपुत, तालुका कृषी अधिकारी, चाळीसगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com