Vidhan sabha : भरीव विकासकामांमुळे महायुतीचे सरकार येणार : स्मृती इराणी  

Smruti irani chalisgaon
Smruti irani chalisgaon

चाळीसगाव ः ‘भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या काही वर्षांतच केंद्रात विविध योजना राबवत भारतातील महिलांचे हात बळकट झाले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका विश्वास’ हा मूलमंत्र जोपासत सर्व समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणले. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विकासकामांच्या बळावर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल’, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले. 

येथील भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज शहरातील लक्ष्मीनगर परिसर, सीताराम पहेलवान मळा येथे झालेल्या विजय संकल्प सभेत त्या बोलत होत्या. सभेला मतदारांचा विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री एम. के. पाटील, खासदार उन्मेष पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, जिल्हा परिषदेचे सभापती पोपट भोळे, कैलास सूर्यवंशी, पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख उमेश गुंजाळ, बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील, अंबाजी ग्रुपचे चित्रसेन पाटील, भाजपचे शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, ‘बेटी बचाओ अभियान’च्या जिल्हाप्रमुख प्रा. डॉ. अस्मिता पाटील, ‘आरपीआय’चे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड, पालिकेतील गटनेते संजय रतनसिंग पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उद्धवराव माळी, सतीश दराडे, माळी समाज संघटनेचे अनिल महाजन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. 
मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, की गेली ५० वर्षे त्यांनी सत्ता भोगली, त्यांच्या काळात भारतातील बऱ्याच भागांमध्ये लाइटसुद्धा नव्हते. मात्र, भाजपचे सरकार येताच आज संपूर्ण देशात प्रत्येक ठिकाणी वीजपुरवठा उपलब्ध आहे. धुरापासून महिलांना होणारा त्रास राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिसला नाही. मात्र, भाजपच्या केंद्र आणि राज्य शासनाने उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घराघरांपर्यंत गॅस पोचला आहे; त्याचबरोबर स्त्रियांना सन्मानाने जगता यावे, म्हणून सर्वांत पहिले भाजपने प्रत्येक घराला शौचालय दिले. काँग्रेस सरकारच्या काळात या सर्व गोष्टी असूनही यांनी याकडे लक्ष दिले नाही. म्हणूनच त्यांच्यावर आज ही वेळ आली आहे. संपूर्ण भारतात शाळांना ‘हायटेक’ शिक्षण मिळावे म्हणून सर्व सरकारी शाळा डिजिटल केल्या जात आहेत. भाजपने कामे केली आहेत म्हणूनच आज तुमच्यापुढे मत मागण्यासाठी आम्ही येत आहोत. मात्र, ज्यांनी सत्तेच्या काळात कुठलीच कामे केली नाहीत, त्यांना जनतेपुढे मत मागताना निरर्थक मुद्द्यांवर दिशाभूल करावी वाटते. जनतेचे प्रश्न सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांना कळणार नाही, असे सांगून त्यासाठी मंगेश चव्हाणांसारखा गरीब कुटुंबातील उमेदवारच जनतेला योग्य न्याय देऊ शकतो, म्हणूनच पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून सध्या ते जातपात व महापुरुषांची नावे घेऊन राजकारण करीत आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, ‘कमळा’समोरील बटन दाबून भाजपला पुन्हा एकदा सेवेची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

मंगेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की चाळीसगावातील राष्ट्रवादीचे उमेदवार आपल्याच पक्षातील कुठल्याही कार्यकर्त्याला पुढे जाऊ न देता आपल्याच कुटुंबात सत्ता कशी येईल, त्याकडे जास्त कल देत असतात. तीन पिढ्यांपासून त्यांना सत्तेचा मोह सुटला नाही. त्यांना कार्यकर्त्यांमधील गुण कसे दिसतील? भाजप अशा कुठल्याच गोष्टींना थारा न देता, आजवर सर्वसामान्य कार्यकर्ता असलेल्या उमेदवाराला प्रतिनिधित्व करण्याची संधी देत असतो. मी या संधीचे सोने करून शासनाच्या माध्यमातून राज्यात अव्वल तालुका म्हणून चाळीसगाव विकसित करण्याचा संकल्प करीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवायचे असतील तर शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोचले पाहिजे. त्यासाठी मी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली. 

खासदार उन्मेष पाटील यांनी मनोगतात भाजपमधील सर्व गट- तट आज मंगेशदादा चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी एकत्र आले आहेत. राज्यात पुन्हा शिवशाही सरकार येण्यासाठी एकेक जागा महत्त्वाची आहे. येत्या २१ तारखेला बहुमताने मंगेश चव्हाण निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी तालुक्याला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा सात कलमी कार्यक्रम मांडणारा जाहीरनामा मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. सुनील निकम यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, सायंकाळी पाचपर्यंत प्रचार करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com