चाळीसगावला नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

चाळीसगाव - चाळीसगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांनी पालिकेत आज दुपारी एकला पदभार स्वीकारला. तत्पूर्वी आमदाराच्या कार्यालयापासून पालिकेपर्यंत भाजपच्या वतीने मिरवणूक काढली. आमदार उन्मेष पाटील, पालिकेतील भाजपचे गटनेते राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ नेते वाडीलाल राठोड, बाजार समिती सभापती रवींद्र पाटील, भाजप राज्य कार्यकारणी सदस्य यु. डी. माळी, भय्यासाहेब पाटील यांच्यासह भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

चाळीसगाव - चाळीसगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांनी पालिकेत आज दुपारी एकला पदभार स्वीकारला. तत्पूर्वी आमदाराच्या कार्यालयापासून पालिकेपर्यंत भाजपच्या वतीने मिरवणूक काढली. आमदार उन्मेष पाटील, पालिकेतील भाजपचे गटनेते राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ नेते वाडीलाल राठोड, बाजार समिती सभापती रवींद्र पाटील, भाजप राज्य कार्यकारणी सदस्य यु. डी. माळी, भय्यासाहेब पाटील यांच्यासह भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी कार्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळ नगराध्यक्ष आशालता चव्हाण व आमदार उन्मेष पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर नगराध्यक्ष कक्षात आशालता चव्हाण यांनी रीतसर पदभार स्वीकारला. मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी पालिका प्रशासनातर्फे नगराध्यक्षांसह आमदार व नगरसेवक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

भाजपकडून मिरवणूक
दरम्यान सकाळी दहाला आमदारांच्या कार्यालयापासून आमदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढली. मिरवणुकीत प्रत्येक चौकात फटाक्‍यांची आतषबाजी केली. कार्यकर्त्यांनी ठेका धरत मिरवणुकीत सहभाग नोंदविला. दुपारी एकला ही मिरवणूक पालिका कार्यालयात पोहोचली. पालिकेजवळ मुख्य प्रवेशद्वार व आतील प्रवेशद्वाराजवळ स्वागत कमानी उभारल्या होत्या.

आमदार उन्मेष पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर पालिकेवर असलेली एकहाती सत्ता पहिल्यांदाच संपुष्टात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. राजकारण बाजूला ठेवून शहरातील उणीव भरून काढू. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा चेहरा मोहरा बदलविणार आहे. चाळीसगाव शहराला राज्यात एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पालिकेतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य तथा भाजपचे गटनेते राजेंद्र चौधरी यांनी भावना विवष होत मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, आमदार उन्मेष पाटील यांच्या कल्पक नेतृत्वाखाली ४५ वर्षांनंतर भाजपला पालिकेत सत्ता मिळाली आहे. मी पस्तीस वर्षांपासून पालिकेचा सदस्य आहे. जनतेच्या भल्यासाठी बोलताना विरोधकांनी अनेकदा माझा अपमान केला. त्यामुळे मिळालेली सत्ता ही जनतेच्या भल्यासाठी वापरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्‍वर पाटील, शेखर बजाज, संजय पाटील, अरुण अहिरे, मानसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, चिरागुनद्दीन शेख, विजया पवार, वैशाली राजपूत, वैशाली मोरे, झेलाबाई देवकर, वस्तसलाबाई महाले तथा माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी तसेच इम्रान शेख, कैसर खालिद, ॲड. प्रशांत पालवे, अमोल नानकर, रवींद्र पाटील, राजेंद्र पगार, अरुण पाटील, प्रकाश जाधव, नागशे मराठे, विजय निकुंभ, माजी नगरसवेक बाळासाहेब मोरे, सोमसिंग राजपूत, हिराशेठ बजाज यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

आमदारांनी धरला ठेका 
लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांची मिरवणूक सिग्नल चौकात आल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार उन्मेष पाटील यांना खांद्यावर घेत ठेका धरायला लावला. आमदारांनीही  ठेका धरल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. आमचे नेते आमदार उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सबका साथ सबका विकास’ डोळ्यासमोर ठेवून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आपला संकल्प केला आहे. यासाठी पालिकेतील सर्व सदस्यांना विश्‍वासात घेऊन शहराचा विकास करण्यावर आपला भर राहील. 
- आशालता चव्हाण : नगराध्यक्षा, चाळीसगाव

Web Title: chalisgav mayor