रेल्वेखाली सापडल्याने जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

चाळीसगाव - रेल्वे खाली सापडल्याने जिल्ह्यात आज वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला असून, एक जखमी झाला. चाळीसगाव, पाचोरा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या या घटनांची रेल्वे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. मृतांमध्ये उत्राण येथील एकाचा समावेश असून, तेथीलच एकजण जखमी झाल्याने गावावर शोककळा पसरली.

चाळीसगाव - रेल्वे खाली सापडल्याने जिल्ह्यात आज वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला असून, एक जखमी झाला. चाळीसगाव, पाचोरा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या या घटनांची रेल्वे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. मृतांमध्ये उत्राण येथील एकाचा समावेश असून, तेथीलच एकजण जखमी झाल्याने गावावर शोककळा पसरली.

पहिल्या घटनेत चाळीसगाव येथील दूधसागर मार्गावरील हॉटेल मनोरमाचे व्यवस्थापक राजेंद्र भाऊसाहेब पाटील (वय ४५, रा. धर्मार्थ दवाखाना, संजय गांधीनगर) हे आज सकाळी अकरापूर्वी चाळीसगाव रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर अप लाइनवरील खांबा क्रमांक ३३७ वर भुसावळ- मुंबई पॅसेंजर गाडीखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. दुसऱ्या एका घटनेत सकाळी दहाच्या सुमारास शहरातील शाहूनगरातील गजानन मंदिर परिसरातील रहिवासी दिलीप रामदास पाटील (वय ५०) यांचा रेल्वेच्या इंजिनखाली सापडून मृत्यू झाला. 

उत्राण गावावर शोककळा
उत्राण येथील राहुल दिलीप सोनवणे (वय १७) हा तरुण पुणे येथे आपल्या मामाकडे दहावीत शिकायला होता. नुकताच निकाल लागून तो उत्तीर्ण झाल्याने पुणे येथे मामाकडे शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी गेला होता. काल (ता. २८) दाखला घेऊन महाराष्ट्र एक्‍स्प्रेसने तो पुन्हा उत्राणला येण्यासाठी निघाला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास पाचोरा रेल्वेस्थानक दहा किलोमीटर असताना बाळद (ता. पाचोरा) शिवारातील खांबा क्रमांक ३५६/२५ ते ३५६/२८ दरम्यान धावत्या रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत नगरदेवळा स्टेशनमास्तरांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृत तरुणाची बॅग व खिशातील तिकिटावरून त्याच्या मामांशी संपर्क साधून संपर्क केल्यानंतर ओळख पटली. मृत राहुलवर उत्राणला अंत्यसंस्कार करण्यात आले. 

उत्राणचाच तरुण जखमी 
राहुल सोनवणेवर अंत्यसंस्कार होत नाहीत, तोच सांयकाळी चारला उत्राण येथील भगवान आनंदा चौधरी (वय २७) हा विवाहित तरुण कामायनी एक्‍स्प्रेसने मुंबईला जाण्यासाठी पाचोरा रेल्वेस्थानकावरून बसला. गाडी प्लॅटफॉर्म सोडत नाही, तोच काही अंतरावर त्याचा तोल गेला व तो खाली पडल्याने जबर जखमी झाला. त्याचा एक हात एक पाय कापला गेला असून, दुसऱ्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्यावर जळगावला उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, जखमी भगवान चौधरी हा तरुण मुंबईला खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याचे महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. दोन्ही घटनांचा तपास रेल्वे पोलिस निरीक्षक एस. सी. मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील व राजू पाटील हे करीत आहेत.

Web Title: chalisgav news three death by railway dash