पाटणादेवीच्या डोहात तरुणाचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

चाळीसगाव - पाटणादेवी (ता. चाळीसगाव) येथील धवलतीर्थ धबधब्याच्या डोहात पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. कुंडलवाडी (जि. नांदेड) येथील हा तरुण चाळीसगावला फायनान्स कंपनीत कामाला होता. 

चाळीसगाव - पाटणादेवी (ता. चाळीसगाव) येथील धवलतीर्थ धबधब्याच्या डोहात पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. कुंडलवाडी (जि. नांदेड) येथील हा तरुण चाळीसगावला फायनान्स कंपनीत कामाला होता. 

अधिक माहिती अशी - चाळीसगाव येथील खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या ग्रामशक्ती फायनान्स कंपनीतील दहा कर्मचारी आज पाटणादेवीच्या जंगलात फिरण्यासाठी गेले होते. पावसामुळे जंगलातील धबधबे कोसळू लागल्याने पर्यटकांची तेथे गर्दी होत आहे. देवीच्या मंदिरामागील धवलतीर्थ धबधबा पाहण्यासाठी हे सर्व जण गेले असता, त्यांच्यातील योगेश्‍वर राजेश्‍वर मोरे (वय २७, रा. कुंडलवाडी, ता. नायगाव, जि. नांदेड) याचा पाय घसरल्याने तो डोहात पडला. डोंगरावरून धबधब्याची धार वेगात असल्याने पाण्याच्या प्रवाहात तो काही सेकंदांतच दिसेनासा झाला. यावेळी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह त्याच्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. अखेर पट्टीचा पोहणारा कैलास चव्हाण या वनमजुराने अथक प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह डोहातून बाहेर काढला. मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पटवर्धन, वनपाल आर. बी. शेटे, वनरक्षक शिंदे, पोलिस कर्मचारी दिलीप रोकडे, नितीन आमोदकर, संजय काळे, दत्तात्रय महाजन यावेळी उपस्थित होते. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते. 

या घटनेबाबत मृत योगेश्‍वरच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो डोहात पडल्यानंतर एकदा वर आला. त्याने आपला हातही वर केला. त्यानंतर तो परत वर आलाच नाही. दोन दिवसांपूर्वीच योगेश्‍वरचा वाढदिवस त्याच्या मित्रांनी साजरा केला होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, धबधब्याच्या दोन नंबर कुंडाच्या ठिकाणी अशा घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. यामुळे वन विभागाने या ठिकाणी ठळक अक्षरात ‘सावधान, धोक्‍याचे ठिकाण’ अशी सूचना लिहिलेली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून अनेक तरुण उत्साहाच्या भरात पाण्याशी खेळण्याचा प्रयत्न करतात. आजच्या घटनेपासून पर्यटकांनी बोध घेऊन वन विभागाच्या सूचनांचे पालन करूनच जंगलात भ्रमंती करावी, असे श्री. ठोंबरे यांनी सांगितले.

Web Title: chalisgav news The youth drowned in Patna Devi's dowry