Loksabha 2019 : नव्या प्रतिस्पर्ध्यांमुळे लढतीत चुरस

कैलास शिंदे
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

भाजपने खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी नाकारली, आमदार स्मिता वाघ यांनी पक्षातर्फे अर्जही दाखल केला. मात्र, ऐनवेळी त्यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. मात्र, संघटनेच्या बळावर उमेदवाराने प्रचार सुरू केलाय. शिवसेनाही साथीला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे गुलाबराव देवकर यांच्या उमेदवारीमुळे दोन्ही काँग्रेस एकदिलाने प्रचारात उतरल्यात, त्यामुळे लढत तुल्यबळ आहे. 

जळगाव लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बदलामुळे राज्यभरात गाजला. खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते नाराज आहेत. आमदार स्मिता वाघ यांचे पती उदय यांनी षड्‌यंत्र करून आपली उमेदवारी कापली, असा त्यांनी समर्थकांच्या मेळाव्यात जाहीरपणे आरोप केला. त्यांचा हा आरोप सुरू असतानाच पक्षाने वाघ यांनाही उमेदवारी नाकारून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे वाघही नाराज झाल्यात. त्यांनी पक्षाने आपला ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ केला, असा थेट आरोप केला. त्यामुळे सध्या तरी भाजपमध्ये नाराजी, अंतर्गत धुसफूस आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन त्यांना कसे समजावणार, याकडेच सर्वांचे लक्ष आहे. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनाही सुरवातीला नाराज होता. मात्र, भाजपची सत्ता असलेल्या जिल्हा परिषद, महापालिकेत शिवसेनेलाही वाटा देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर त्यांनीही प्रचार सुरू केलाय. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी जोमाने प्रचार सुरू केलाय.

राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्हीही काँग्रेस एकदिलाने प्रचारात उतरल्यात. याशिवाय राष्ट्रवादीने रावेर मतदारसंघ कोणत्याही अटीशिवाय काँग्रेसला दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे. दोन्ही पक्षांसह रिपब्लिकनचा (कवाडे) गटही जोमाने कामाला लागलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली सभा मतदारसंघात एरंडोल येथे झाली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे देवकरांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय.

मतदारसंघात उन्मेष पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यातच लढत आहे. मराठाबहुल मतदारसंघात दोन्ही उमेदवार मराठा आहेत. देवकर यांची कर्मभूमी जळगाव असली, तरी ते चाळीसगाव तालुक्‍यातील रहिवासी आहेत. तर, भाजपचे उन्मेष पाटील चाळीसगावचे आमदार आहेत. दोन्हीही उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय. मात्र, अद्याप तरी भेटीगाठीवरच दोघांचाही भर आहे. या दोघांशिवाय बहुजन वंचित आघाडीतर्फे उज्ज्वला बाविस्कर यांच्यासह बारा उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस तापमान असून, उन्हाच्या तडाख्यात प्रचार करताना उमेदवार अन्‌ कार्यकर्त्यांचीही कसोटी आहे.

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्‍न
पाडळसे, शेळगाव अपूर्ण सिंचन प्रकल्प
महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले 
जळगाव एमआयडीसीची दुरवस्था 

Web Title: Challenge to fight against new competitors in jalgaon Lok Sabha Constituency