पटेलांच्या यशाचा भाजपतर्फे विजयोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत चंदुलाल पटेल यांचा विजय झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप कार्यालय व नवनिर्वाचित आमदार पटेल यांच्या निवासस्थानी फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व श्री. पटेल यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिवसभर पाहावयास मिळाले.

जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत चंदुलाल पटेल यांचा विजय झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप कार्यालय व नवनिर्वाचित आमदार पटेल यांच्या निवासस्थानी फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व श्री. पटेल यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिवसभर पाहावयास मिळाले.

सकाळी विजयी झाल्याचे कळाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार पटेल यांनी भाजप कार्यालय गाठले. तेथे भाजप कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. "भाजपचा विजय असो', "गिरीशभाऊ आगे बढो'च्या घोषणा दिल्या. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार हरिभाऊ जावळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयाग कोळी आदी उपस्थित होते.

माजी आमदार जैनांचे घेतले आशीर्वाद
भाजप कार्यालयातून आमदार पटेलांसह जलसंपदामंत्री महाजन, आमदार जावळे, भोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष वाघ, माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानी गेले. तेथे आमदार पटेल यांनी श्री. जैन यांचे आशीर्वाद घेतले. आज श्री. जैन यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्यापाठोपाठ इतरांनीही श्री. जैन यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, सुनील मुंदडा आदी उपस्थित होते. "माझ्यापेक्षा मोठा हो' असा आशीर्वाद माजी आमदार जैन यांनी आमदार पटेल यांना दिला.

पटेलांच्या बंगल्यावर दिवाळी
आमदार पटेलांसह सर्व मंडळी पटेल यांच्या ओंकारेश्‍वर मंदिराजवळील बंगल्यावर गेले. तेथे फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आमदार पटेल यांचे स्वागत व औक्षण करण्यात आले. मंत्री महाजन, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, श्रीकांत खटोड, अक्षय खटोड यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी, शुभचिंतकांनी गर्दी केली होती. यावेळी एक तास फटाक्‍यांची आतषबाजी करीत ढोल-ताशे वाजवून एकप्रकारे दिवाळीच साजरी झाली.

असे आहे पटेल यांचे कुटुंबीय
* आमदार पटेल यांना तीन मोठे बंधू (देवराम, भवन, यशवंत) व बहीण आहे. पत्नी शारदाबेन, आई कुंवरबेन आहे. दोन मुले- आशीष व रोहित आहेत. वडील विश्रामभाई यांचे निधन झाले आहे. पटेल कुटुंबीय बांधकाम, पेपर मिल, सॉ मिल, पॅकिंग इंडस्ट्रीज या व्यवसायांत आहेत.

कुटुंबीय काय म्हणतात...
कुंवरबेन पटेल (आई) - चंदुलालला निवडणुकीत विजयी होवो, असा आशीर्वाद दिला होता. देवाकडे त्याच्या विजयासाठी प्रार्थना केली होती. माझा मुलगा आमदार झाला, ही आनंदाची व ऐतिहासिक घटना आहे. त्याच्या हातून समाजकार्य घडो.

शारदाबेन पटेल (पत्नी) - आमच्या कुटुंबातून कोणी आमदार होईल, असे वाटले नव्हते. अचानक त्यांनी आमदारकीच्या उमेदवारीचा अर्ज भरला अन्‌ ते विजयी झाले. हा आनंद अवर्णनीय आहे. विजयामुळे आम्ही पटेल कुटुंबीय अतिशय आनंदात आहोत.

आशिष पटेल (मोठा मुलगा) - आम्ही आतापर्यंत व्यवसायात होतो. आता वडील राजकारणात आले आहेत, याचा आनंद आहे. लोकांची सेवा करण्याची ही मोठी संधी आहे. तिचा आम्ही पुरेपूर उपयोग करू.

रोहित पटेल (लहान मुलगा) - पप्पांना निवडणुकीत यश मिळाल्याने साहजिकच आम्हाला अत्यानंद झाला आहे. माझ्या मित्र परिवारालाही आनंद झाला. पप्पा आमदार झाल्याचा अभिमान आहे.

Web Title: chandulal patel success celebration by bjp