गिरणा परिसरात वाळूमाफियांचा धुमाकूळ

शिवनंदन बाविस्कर
गुरुवार, 10 मे 2018

पिलखोड (ता. चाळीसगाव) : पहाटेचे साडेपाच वाजलेले... गाव साखर झोपेतच... त्यादरम्यान वाळूमाफियांचे ट्रॅक्टर मालेगाव रस्त्यावर सुसाट निघतात... ट्रॅक्टरचा तहसिलदारांकडून पाठलाग होतो... चालक जीवावर उदार होऊन ट्रॅक्टर पळवतो... तहसिलदारांना रोखण्यासाठी त्यांच्या वाहनावर वाळू फेकली जाते... हा थरारक प्रकार काल (ता. 9) पहाटेच्या सुमारास गावात घडला. कारवाईच्या भीतीने वाळूचोर आडवाटेने 'फिल्मिस्टाईसल'ने फरारी झाले. दरम्यान, वाळूमाफियांच्या विरोधात शासकीय कामात अडथडा व ठार मारण्याचा उद्देशाने वाळु व फावडे फेकल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, येथील गिरणा नदीपात्रात छुप्या पद्धतीने अवैध वाळू उपसा सुरु आहे. या प्रकारची माहिती तहसिलदार कैलास देवरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांचे पथक कारवाईसाठी गावात दाखल झाले. काल(ता. 9) सकाळी साडेपाचला पिलखोड बसस्थानकावर तहसिलदार आले असता, त्यांना वाळुचोरी करणारे ट्रॅक्टर दिसले. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाळू माफियांनी न जुमानता मालेगावकडे पळ काढला. 

तहसिलदार देवरे यांच्यासह त्यांच्या पथकाने ट्रॅक्टरचा पाठलाग केला. पाठलाग करत केला. वाळू माफियांनी तहसिलदारांच्या वाहनावर वाळु फेकायला सुरुवात केली. तरीही तहसीलदारांचे वाहन आपल्या मागावर येत असल्याने वाळू माफियांनी त्यांच्या वाहनाच्या दिशेने फावडे देखील फेकले. 

साकुरफाट्याच्या अलिकडील पोल्ट्री फार्मकडे असलेल्या एका शेताच्या वाटेतून ट्रॅक्टरचालक पसार झाले, अशी माहिती तहसिलदार कैलास देवरे यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली.

दरम्यान शासकीय कामात अडथडा व जीवेमारण्याची उद्देशाने वाळू व फावडे फेकल्यामुळे ट्रॅक्टरचालक सुनिल कोळी, प्रकाश मगर आणि दोन अज्ञात व्यक्तींवर(रा. उपखेड) मेहुणबारे पोलीस ठाण्यात तलाठी मनोज शिरसाठ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जीवाची पर्वा कुणाला?
सध्या परिसरात वाळूचोरणारे मोठे रॅकेट सक्रीय झाले आहे. रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाळू चोरली जाते. शिवाय वाळू माफिया हे स्वतःच्या  जीवावर उदार होत, दुसर्याचा जीव धोक्यात घालत ट्रॅक्टर चालवतात. त्यामुळे अशा माफियांवर शासनाने कडक कारवाई करुन रोखावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाळू चोरांवर कारवाई करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमली आहेत. वाळू चोरीची माहिती मिळाल्यास तात्काळ पथकाला कारवाईसाठी पाचारण केले जाते. शिवाय वाळू चोरांवर कारवाई करण्यासाठी पथकातील काही अधिकारी रात्री शेतात बसून असतात. 

- कैलास देवरे, तहसिलदार, चाळीसगाव

Web Title: chaos of sand mafia in girana area