वादळामुळे चार लाख केळीची खोडे भुईसपाट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

वादळामुळे चार लाख केळीची खोडे भुईसपाट 

वादळामुळे चार लाख केळीची खोडे भुईसपाट 
यावल, ता. 18 : तालुक्‍यात दरवर्षी निसर्गासह काही व्यापाऱ्यांकडून फसगत झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाडीची संक्रांत सुरु आहे. तालुक्‍यात गेल्या 2 जूनला झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने पश्‍चिम भागात आडगाव, कासारखेडा, चिंचोली सह परीसरात किमान 11 गावांत 120 शेतकऱ्यांचे 93 हेक्‍टरवरील चार लाख दहा हजार केळीची खोडे वादळी तडाख्यामुळे उन्मळून पडून सुमारे एक कोटीचे वर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने शासनाने तरी शेतकऱ्यांच्या पदरी योग्य ती नुकसान भरपाई त्वरीत द्यावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
चक्रीवादळ आमच्या पाचवीलाच पुजलेले आहे असेही शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. चोपडा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्‍यात नुकसानग्रस्त चिंचोली, आडगाव, कासारखेडा गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार सोनवणे यांनी दिले. मात्र ती शासकीय मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष जमा होईल तेव्हा खरे.. असा समज झाला आहे. यापूर्वीची छत्रपती कृषी सन्मान योजनेचे पैसे प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले नसल्याचा आरोप आहे. केळी उत्पादक शेतकरीचे कांहीचे 70ते 80 टक्के तर काहींचे 50 टक्के चे वर नुकसान झाले आहे . ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे . लोटन खंडु बडगुजर यांचे पाच हजार केळी पैकी चार हजार केळीचे नुकसान झाले आहे . कासारखेडा येथील भागवत शंकरराव पाटील यांचे नऊ हजार टिश्‍यूकल्चर केळीची बाग पूर्णतः उध्वस्त झाली आहे. 
यावल तालुका रावेर आणि चोपडा मतदारसंघात विभागला गेला असल्यामुळे तालुक्‍यात पूर्व आणि पश्‍चिम भागात दोन आमदार तेही सत्तेत असतांना तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या समस्या त्वरेने मार्गी लागणे अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

शेतकऱ्यांच्या व्यथा....... 
90टक्के केळीबाग भुईसपाट 
भागवत शंकर पाटील: चौदा रुपये प्रतिखोड प्रमाणे दहा हजार टिश्‍यूकल्चर केळीची खोडे लावली होती. केळीची बाग उगवण उत्तम होती.50 लाख रुपये उत्पन्न येईल अशी आशा होती. मात्र अचानक आलेल्या वादळामुळे होत्याचे नव्हते झाले 90टक्के केळी बाग अक्षरशः भुईसपाट झाली. राजकीय नेत्यांनी, शासनाने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे नाटक करु नये. निसर्गाच्या घातानंतर शासनाने तरी आता घात करू नये अशी अपेक्षा. 

कर्जाचा डोंगर वाढणार 
नितीन भास्कर पाटील : शेतात विहिरीला पाणी जेमतेम म्हणून शेजारून पाणी घेऊन दोन शेतांमध्ये दहा हजार खोड लावले होते. मात्र निसर्गाच्या कोपामुळे पूर्णतः उध्वस्त झालो आहे. शेतात थोडीफार जी खोडं उभी आहेत ती आता जगणार नसल्याने कर्जाचा डोंगर वाढणार आहे. 
 

Web Title: char