चाऱ्याअभावी निम्‍या किमतीत जनावरे विक्री

chalisgaon animal bajar chara tanchai
chalisgaon animal bajar chara tanchai

चाळीसगाव ः यंदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. गुरांसाठी लागणारा चाराही सर्वत्र मातीमोल झाला आहे. ज्‍वारी, बाजरी व मक्‍याचा चारा सडल्‍याने चाऱ्याअभावी निम्‍या किमतीत जनावरे विक्री करावी लागत आहेत. पशुपालकांना चाऱ्यासाठी भटंकती करावी लागत आहे. चाळीसगाव बाजार समितीत जनावरांची आवक मोठी असून, जनावरे खरेदीदारांची संख्‍या मात्र घटली असल्‍याने बाजारात मंदीचे वातावरण आहे. 

राज्‍यभरात वरूण राजाने यंदा चांगली कृपा दाखविल्‍याने सर्वत्र चांगल्‍या पद्धतीचे पीक दिसत होती. ज्‍वारी, बाजरी, मका कापूस ही पिके चांगली आल्‍याने शेतकऱ्यांना चांगल्‍या उत्‍पन्‍नाची आशाही होती. परंतु गेल्‍या महिनाभरापासून सुरू असलेल्‍या अवकाळी पावसामुळे ज्‍वारी, बाजरी मका ही पिके पाण्याखाली गेल्‍याने ती सडली आहेत. यात धान्‍य आणि चारा सडल्‍याने माणसांसमवेत जनावरांचेही चाऱ्यासाठी मोठे हाल होताना दिसत आहेत. चाळीसगाव येथे शनिवारी भरत असलेल्‍या जनावरांच्‍या आठवडे बाजारात धुळे, जळगाव, मालेगाव, कन्‍नडसह अन्‍य ठिकाणाहून गाय, म्‍हैस, बकरी, बैल यांची मोठी आवक होते. चाळीसगाव तालुक्‍यात सर्व जनावरांची संख्‍या जवळपास दीड लाख आहे. परंतु परतीच्‍या पावसामुळे चारा सडल्‍याने दुभती जनावरे बाजारात उभे करत आहेत. मात्र, खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांना जनावरे निम्‍या किमतीत विक्री करावी लागत आहेत. सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत बाजारात जनावरांची मोठया जोमात खरेदी विक्री होते. परंतु गरजेपेक्षा जास्‍त जनावरे विक्रीसाठी येत असून, जनावरे घेण्‍यासाठी कुणी पुढे येत नसल्‍याने अनेकांना विक्रीसाठी आणलेली आपली जनावरे तशीच परत घरी न्‍यावी लागत आहेत. एकीकडे शेतकरी ओल्‍या दुष्‍काळाने मोठया प्रमाणात होरपळला जात असून दुसरीकडे जिवापाड जपलेली जनावरे ही मातीमोल किमतीत विक्री करावी लागत असल्‍याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 


जातिवंत जनावरेही कवडीमोल भावात 
चाळीसगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीतील बैलांचा बाजार उत्तर महाराष्‍ट्रात प्रसिद्ध आहे. येथील बैल बाजारात खिल्‍लार, मद्रासी, गावरान खिल्‍लार, रेंडी असे जातिवंत बैल सोलापूरसह कर्नाटक राज्‍यातून विक्रीसाठी येतात. येथील बैलबाजारात दर शनिवारी लाखोंची उलाढाल होत असते. अनेक शेतकरी केवळ शौकखातीर दोन लाखांचे बैल सांभाळतात. परंतु यंदा चारा नसल्‍याने त्‍यांनाही बैलजोडी विकल्‍याची वेळ आली आहे. लोणी व नगर भागातून विविध प्रजातींच्‍या गाई व जातिवंत म्‍हशी देखील विक्रीसाठी येतात. जातिवंत जनावरांसाठी हा बाजार प्रसिद्ध असला तरीही ग्राहक नसल्‍याने मात्र बाजारात मोठा शुकशुकाट दिसला. जनावरे पाळण्‍यासाठी त्‍यांना चाराच नसल्‍याने अनेक पशुपालक जातिवंत जनावरेही कवडीमोल भावात देत आहेत. 


यंदा पाणी मुबलक आहे. परंतु अवकाळी पावसामुळे चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गवतासह मका, ज्‍वारी व शाळुचा चाराही पावसामुळे सडला आहे. यामुळे जनावरांना चाराच मिळत नसल्‍याने बाजारात जनावरांची आवक वाढली असून, त्यांना खरेदी करणारे ग्राहक मात्र दिसत नाहीत. 

- अण्‍णा आगोणे, बैल व्‍यापारी 


-अशी आहे आकडेवारी 
- आठवडे बाजारात होत असलेली उलाढाल - ६० ते ७० लाख 
- उत्‍तम प्रतीच्या बैलजोडीची किंमत - १ लाख २५ हजार 
-तालुक्‍यात एकूण गुरांची संख्‍या - १ लाख ७५ हजार 
-उच्‍च प्रतीच्या गायीची किंमत - ६० हजार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com