राज्यात ‘कॉल सेंटर’द्वारे फसवणुकीचा गोरखधंदा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

‘फस्टलाईफ इन्शुरन्स’च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तत्काळ पॉलिसीचा प्रीमियम ऑनलाइन भरण्यास भाग पाडून १ लाख १४ हजार ३८८ रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली होती.

जळगाव - ‘फस्टलाईफ इन्शुरन्स’च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तत्काळ पॉलिसीचा प्रीमियम ऑनलाइन भरण्यास भाग पाडून १ लाख १४ हजार ३८८ रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली होती. तक्रारदार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे व तेथून सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस पथकाने भांडूप (मुंबई) येथील अल्ट्रा मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नावाच्या कॉल सेंटरचा चालक रोहित राजेंद्र पारटे (वय ३०) याला अटक केली आहे. या कॉल सेंटरद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांना गंडविण्यात आल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली असून, संशयिताची कोठडीत चौकशी करण्यात येत आहे.  
गणेश कॉलनी परिसरातील चैतन्यनगरातील रहिवासी कपिल विजय मोरे (वय २१) या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ‘फस्टलाईफ इन्शुरन्स’च्या मुंबई येथील मुख्यालयातून ५ मार्चला फोन आला होता. फोनवर युनिट हेड प्रतीक पवार बोलत असल्याचे सांगत कपिल मोरे यांना तत्काळ पॉलिसीचा प्रीमियम आणि जीएसटी अशी रक्कम ऑनलाइन भरण्याचे सांगण्यात आले; अन्यथा पॉलिसी नॅप्स्‌ची भीती दर्शविल्याने मोरे यांनी तत्काळ वडिलांच्या नावे असलेल्या सिंडिकेट बॅंकेच्या खात्यातून १ लाख १४ हजार ३८८ रुपये जीएसटीसह ऑनलाइन भरणा केला होता. पॉलिसीचे प्रीमियम असल्याचे सांगून आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर कपिल मोरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दाखल गुन्ह्यात सायबर पोलिस ठाण्याच्या तंत्रज्ञांनी माहिती काढून तपासाला सुरवात केली होती. पथकाने मुंबईतील ड्रिम्स मॉल भांडूप येथील अल्ट्रा मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येथे धडक दिली. तेथे तपासणी केल्यावर संशयित रोहित राजेंद्र पारटे (वय ३०) याचे नाव समोर आले. मात्र त्याला अगोदरच रायगड पोलिसांनी अटक केली असल्याने पथकाने पेण न्यायालयाच्या ट्रान्झींक्‍ट वॉरंटवर जळगावात आणले. न्या. सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने त्यास पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. सरकारपक्षातर्फे आर. पी. गावित यांनी कामकाज पाहिले.

फसवणुकीचा अड्डा ‘कॉल सेंटर’
भांडूप येथे रोहित राजेंद्र पारटे (वय-३०) हा अल्ट्रा मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कॉल सेंटरद्वारे महाराष्ट्रासह इतर राज्यातील नागरिकांच्या फसवणुकीचा ऑनलाइन धंदा चालवला जात होता. पोलिस पथकाने छापा मारल्यावर या कॉलसेंटरवर ९ ते १० तरुण एकाच वेळेस ऑनलाइन हेराफेरीत व्यस्त असल्याचे आढळून आले. रोहित पारटे याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांनी आणखी किती नागरिकांना गंडा घातला आहे, त्याच्या टोळीत आणखी किती सदस्य आहेत, कोणत्या संगणकाद्वारे, मोबाईलच्या माध्यमातून हा गोरखधंदा सुरू होता ते सर्व सामग्री जप्त करण्यासाठी संशयितांची कोठडी मिळविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating by Call Center Crime