अविकसित मिरची बियाणे विक्रेत्या कंपनीकडून कसमादेच्या युवा शेतकऱ्यांची फसवणूक

रोशन खैरनार
मंगळवार, 17 जुलै 2018

शेतकऱ्यांनी कंपनीवर विश्वास ठेवत नवा प्रयोग म्हणून 'सीमिन्स' कंपनीचे मार्केटिंग रिजनल ऑफिसर किशोर अहिरे व त्यांचे सहकारी ऋषिकेश पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे दिंडोरी येथील संजय संप यांच्या गायत्री नर्सरी मधून 'सीमिन्स' कंपनीचे सिमला मिरचीचे रोपे आणली व आपापल्या पॉलीहाऊस मध्ये लागवड केली. 
 

सटाणा - आपल्या पॉली हाउसमध्ये लाखो रुपये खर्चून एका नामांकित सिमला मिरची लागवड करणाऱ्या कसमादे परिसरातील ७० ते ८० युवा शेतकऱ्यांची अविकसित मिरची बियाणे खरेदी केल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बियाणे, लागवड, मशागत, खते, कीटकनाशके यावर झालेला खर्चही न निघाल्याने या युवा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या अविकसित मिरची बियाणे विक्रेत्या कंपनीविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तर सटाणा पोलिस ठाण्यात संबंधित मिरची बियाणे कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. 

बागलाण, मालेगाव, देवळा, चांदवड, कळवण या तालुक्यातील उच्चशिक्षित युवा शेतकऱ्यांनी नोकऱ्यांमागे न धावता अत्याधुनिक शेतीचा प्रयोग सुरु केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेवून या शेतकऱ्यांनी उच्च दर्जाचे पॉलीहाऊस उभारले. दरम्यान, 'सीमिन्स' कंपनीच्या कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आपल्या कंपनीच्या सिमला मिरचीची लागवड करण्याचा सल्ला देत मार्गदर्शन केले. याच कंपनीच्या बियाण्याच्या सिमला मिरच्यांचा दर्जा दाखविण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संबधित शेतकऱ्यांना काही प्लॉटचे फोटोही दाखविले. शेतकऱ्यांनी कंपनीवर विश्वास ठेवत नवा प्रयोग म्हणून 'सीमिन्स' कंपनीचे मार्केटिंग रिजनल ऑफिसर किशोर अहिरे व त्यांचे सहकारी ऋषिकेश पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे दिंडोरी येथील संजय संप यांच्या गायत्री नर्सरी मधून 'सीमिन्स' कंपनीचे सिमला मिरचीचे रोपे आणली व आपापल्या पॉलीहाऊस मध्ये लागवड केली. 

पिक आल्यानंतर जेव्हा सिमला मिरची झाडांना लागल्या तेव्हा मात्र सर्वच शेतकऱ्यांना धक्का बसला. कंपनीने सांगितल्याप्रमाणे एकाही शेतकऱ्याच्या पॉलीहाऊसमध्ये चांगल्या दर्जाच्या मिरच्यांचे पिक आलेले नव्हते. ओबडधोबड आकाराच्या मिरच्या लागल्याचे पाहून संबंधित शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार संपर्कही साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीकडून एकाही शेतकऱ्याला प्रतिसाद न मिळाल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांचा प्रतिएकरी अडीच लाख रुपये लागवड खर्च झाला असून एक एकर पॉलीहाऊससाठी बँकेकडून आठ लाख रुपये कर्ज घेतले आहे. असे असतांना कंपनीने बोगस वाण देवून शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. 

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये राजेंद्र पाटील (सटाणा, एक एकर), केशव जाधव (सातमाने, बारा एकर), गोरख खैरनार (चिंचावड, दीड एकर), किरण पाटील (चिंचावड, दीड एकर), बाळासाहेब खैरनार (चिंचावड, दोन एकर), योगेश शेवाळे (चिंचावड, तीन एकर), निंबा भामरे (चिंचावड, तीन एकर), भगवान खैरनार (चिंचावड, दोन एकर), योगेश जाधव (चिंचावड, एका एकर), कारभारी गांगुर्डे (चिंचावड, तीन एकर), जिभाऊ गांगुर्डे (चिंचावड, अडीच एकर), आशुतोष सोनवणे (सटाणा दीड एकर), प्रवीण सोनवणे (महड, तीस गुंठे), योगेश चव्हाण (सटाणा, एक एकर), अविनाश जाधव (बिजोटे, एक एकर), केदा जगताप (लाडूद, अडीच एकर), निलेश सोनवणे (सटाणा, एक एकर), मनोज भामरे (पिंगळवाडे, एक एकर), योगेश पवार (लखमापूर, तीन एकर), नितीन निकम (राहूड ता.चांदवड, दोन एकर) आदींसह सत्तर ते ऐंशी शेतकऱ्यांचा समावेश आहे.    

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Cheating With Young Farmers of Kasmade Satana