भाजपात आलेल्यांच्या निष्ठा तपासा - खडसे

Eknath Khadse
Eknath Khadse

जळगाव - भारतीय जनता पक्षात येणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा ओढा वाढला आहे. पक्षवाढीसाठी त्यांना घेणेही आवश्‍यक आहे. परंतु, त्यांच्या निष्ठाही काळजीपूर्वक तपासा, नाहीतर आपल्याकडे येऊन आपल्याच विरोधात काम करतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत सावध राहावे, असे अवाहन राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या बूथ व शक्तिकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. 

जळगाव येथील संत बाबा हरदासराम मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पक्षाचे विभागीय संघटनमंत्री विजयराव पुराणिक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल आदी उपस्थित होते. या वेळी खडसे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचाच मुद्दा होता.

त्यामुळे जनतेने त्यांच्याकडे पाहूनच पक्षाला मतदान केले आहे. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत वेगळे मुद्दे असतील. तसेच, आता आपल्या पक्षात अनेक जण येत आहेत. नेते आणि त्यांचे कार्यकर्तेही आहेत. पक्ष वाढविण्यासाठी पक्षात प्रवेश देणे गरजेचे आहे. मात्र, कार्यकर्ते आपल्या पक्षात आल्यानंतर ते आपल्या पक्षाचेच कार्य करीत आहेत काय, हे पाहणे गरजेचे आहे. आपल्या पक्षात प्रवेश केला आणि त्यांची निष्ठा पूर्वीच्याच पक्षात असेल तर आपले नुकसान होईल. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी याबाबत सावध असले पाहिजे. आपण कोणत्याही प्रकारे गाफील राहता कामा नये. जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा आपणच जिंकणार आहोत, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com