बाजार समित्यांसाठी "चेक क्‍लिअरिंग सिस्टिम'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नाशिक- चलनाचा तुटवडा आणि क्‍लीष्ट बॅंकिंग प्रणालीतून शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहाराचा प्रश्‍न सुटावा म्हणून बाजार समित्यांसाठी "चेक क्‍लिअरिंग सिस्टिम' राबविण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर 24 तासांत पैसे जमा होतील. यासंबंधीचा निर्णय जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक- चलनाचा तुटवडा आणि क्‍लीष्ट बॅंकिंग प्रणालीतून शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहाराचा प्रश्‍न सुटावा म्हणून बाजार समित्यांसाठी "चेक क्‍लिअरिंग सिस्टिम' राबविण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर 24 तासांत पैसे जमा होतील. यासंबंधीचा निर्णय जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी ही माहिती बैठकीनंतर दिली. ते म्हणाले, की बाजार समित्यांमधील व्यवहारांमुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात धनादेश (चेक) द्यावे लागणार आहेत. पण, त्या तुलनेत बॅंकांकडून पुरेसे धनादेश उपलब्ध होण्याबद्दलची समस्या आहे. शिवाय, बॅंकेत धनादेश जमा झाल्यावर वठणावळीच्या प्रक्रियेला वेळ लागतो. यासाठी "चेक क्‍लिअरिंग सिस्टिम' राबविण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीसाठी आठ बाजार समित्या आणि आठ बॅंकांची निवड करण्यात आली आहे.

सहकार विभागातर्फे प्रत्येक बाजार समितीसाठी एक अधिकारी दिला जाणार आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतकऱ्याचे नाव, बॅंक खाते क्रमांक याची बॅंकनिहाय यादी द्यायची आहे. तसेच, सोबत दिवसभरातील खरेदी केलेल्या मालाच्या रकमेपोटीचा संबंधित बॅंकेचा एक धनादेश द्यायचा. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला सहकार विभागाचे अधिकारी धनादेश आणि यादी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येतील. त्याचवेळी आठ बॅंकांचे अधिकारी येतील. त्यांच्याकडे धनादेश आणि शेतकऱ्यांची यादी सोपवली जाईल. त्यानुसार संबंधित बॅंकेचे अधिकारी जिल्हास्तरावरून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम वर्ग करतील. मग शेतकरी बॅंकेतून प्रचलित नियमावलीनुसार खात्यातून पैसे काढून घेऊ शकतील.

योजनेचा होणार विस्तार
जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांमध्ये नवीन प्रणालीला मिळणारा प्रतिसाद पाहून उरलेल्या सर्व बाजार समित्यांमध्ये योजनेचा विस्तार केला जाईल. सध्याच्या प्रणालीत येणाऱ्या अडचणींची सोडवणूक केली जाईल, असेही श्री. करे यांनी सांगितले.

सहभागी बाजार समित्या आणि बॅंका
"चेक क्‍लिअरिंग सिस्टिम'साठी निवडण्यात आलेल्या बाजार समित्या आणि बॅंकांची नावे याप्रमाणे ः

 बाजार समित्या
लासलगाव
पिंपळगाव
येवला
मालेगाव
उमराणे
नांदगाव
मनमाड
सटाणा

बॅंका
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
स्टेट बॅंक ऑफ इंडिया
बॅंक ऑफ इंडिया
बॅंक ऑफ महाराष्ट्र
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
बॅंक ऑफ बडोदा
युनियन बॅंक ऑफ इंडिया
देना बॅंक

Web Title: cheque clearing