#ThursdayMotivation : सामान्य मुलींमध्ये तिच्यामुळे फुलते "चेतना' 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींचे समाजात वावरणे असुरक्षित समजले जाऊ लागले आहे. पण या नाउमेद परिस्थितीत शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थिनींत आत्मविश्‍वास जागवत त्यांना स्वरक्षणाचे धडे शिकविण्यासाठी त्यांच्यापैकीच एक असलेली चेतना दिनेश शर्मा ही युवती धडपडत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मुलींमधील न्यूनगंड घालवताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यात ती कठोर मेहनत घेत आहे. 

नाशिक : अतिशय सामान्य कुटुंबातील असलेल्या चेतना शर्मा हिने शालेय शिक्षण महापालिका शाळेतून घेतले आहे. परिस्थिती नसतानादेखील तिने शालेय वयात कराटे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. कराटे व तायक्‍वांदो या खेळांत तिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. कराटेत तर ब्लॅक बेल्ट मिळविले, पण विद्यापीठीय शिक्षणात या खेळांचा समावेश नसल्याने चेतनाने आपल्यातील कौशल्यांचा वापर करत इतरांना प्रोत्साहन देण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. मीनाक्षी गवळी यांनी तिला मार्गदर्शन केले. स्वत:चे शिक्षण सुरू ठेवत चेतना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलींमध्ये जाऊन त्यांना प्रशिक्षण देते. स्वयंसिद्धासारख्या शिबिरांतून ती युवतींना कराटेचे प्रशिक्षण देऊन अडचणीच्या प्रसंगी स्वत:चा बचाव कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन करीत आहे. आजवर तिने हजारो विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास जागविला आहे. 

उच्चशिक्षणापर्यंत तिची भरारी 
इतरांना प्रोत्साहन देताना चेतनानेदेखील शिक्षण अवितरपणे सुरू ठेवले. कला शाखेतील पदवी अभ्यासक्रम असलेल्या बी.ए.नंतर तिने भूगोल व अर्थशास्त्र अशा दोन विषयांतून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले आहे. इतक्‍यावर न थांबता बी.एड.चे शिक्षण घेतले. एनआयएस प्रशिक्षणासाठी तिने थेट ओडिशा गाठले होते. सध्या ती बीपी.एड.चे शिक्षण घेत आहे.

Image may contain: 1 person, selfie and closeup

दुर्गम भागातही काम 
सध्या चेतना दिंडोरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत कार्यरत असून, या माध्यमातून दिंडोरी तालुका परिसरातील विद्यार्थिनींसाठी ती मेहनत घेत आहे. दुर्गम भागातील या विद्यार्थिनींत ती आत्मविश्वास निर्माण करीत आहे. त्यासाठी विस्तार अधिकारी तडवी, मुख्याध्यापक भारमलकर यांचे पाठबळ लाभत असल्याचे ती सांगते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chetna Sharma Giving Training for Self Defense to girls Nashik News