पोलिसांसोबत राहूनही छबूच्या आले अंगलट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नाशिक - खटारा मोटारसाकलवरून ह्युंडाई कारमध्ये फिरणारा छबू नागरे सामान्यांऐवजी पोलिसांसोबत अधिक राहायचा. अखेर पोलिस कारवाईच त्याच्या अंगलट आली. तसेच समाजामध्ये "व्हॉइट कॉलर' ठेकेदार म्हणून मिरविणाऱ्या रामराव पाटलाच्या बनावटगिरीचाही घडा भरला. 

नाशिक - खटारा मोटारसाकलवरून ह्युंडाई कारमध्ये फिरणारा छबू नागरे सामान्यांऐवजी पोलिसांसोबत अधिक राहायचा. अखेर पोलिस कारवाईच त्याच्या अंगलट आली. तसेच समाजामध्ये "व्हॉइट कॉलर' ठेकेदार म्हणून मिरविणाऱ्या रामराव पाटलाच्या बनावटगिरीचाही घडा भरला. 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा कार्याध्यक्ष छबू अन्‌ रामराव या दोघांना बनावट नोटा प्रकरणात अटक होताच, "ये तो होना ही था' अशी प्रतिक्रिया शहरातून व्यक्त झाली. छबू मूळचा, नगर जिल्ह्यातील. "लेबर कॉन्ट्रॅक्‍ट'ची कामे सुरवातीला करत होता. नाशिकमध्ये आल्यावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा शहराध्यक्ष झाला. आंदोलनात अग्रभागी राहून त्याने "छबी' उजळविण्याचा प्रयत्न केला. गेल्या निवडणुकीत त्याने नशीब आजमावले होते. मतदारांनी त्याला घरचा रस्ता दाखविला. राज्य आणि देशातील सत्तांतरापाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये मरगळ आल्याचे पाहून त्याने शिवसेनेमध्ये कोलांटउडी मारण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा शहरभर होती. मुळातच, छबू वादग्रस्त ठरला असला, तरीही सलगीमुळे पोलिसांकडून कानाडोळा झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटीमध्ये त्याचे नाव चर्चेत आले होते. सरकारी कामात अडथळा आणल्याचे चार गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अशाही परिस्थितीत राजकीय माहोलमध्ये तो उजळमाथ्याने फिरायचा. अर्थात, पोलिसांच्या कृपाशीर्वादामुळे त्याचे आजवर धकत गेले. 

लाच प्रकरणाने लकाकी 
महापालिकेच्या ठेकेदारांमध्ये सर्वाधिक वादग्रस्त कारकीर्द रामराव पाटील याची राहिली. आदर्श घंटागाडी महापालिकेने चालविण्याऐवजी ठेकेदारांतर्फे चालविण्याचा विषय पुढे आला. अनुभव नसताना रामरावला ठेका देण्यात आला. तेव्हापासून घंटागाडी योजनेचा बोजवारा उडण्यास सुरवात झाली. वेळेत घंटागाडी न येणे, खत प्रकल्पात अधिक वजन दाखवून महापालिकेला आर्थिक भुर्दंड देणे, कर्मचाऱ्यांचे वेळेत वेतन अदा न करणे यांसारख्या तक्रारी येत होत्या. याचदरम्यान महापालिकेने अधिक घंटागाड्या वाढविण्याची मागणी ठेकेदार रामराव याच्याकडे केली होती. त्या वेळी सुमारे शंभर घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या. गाड्या खरेदी करताना कर्मचाऱ्यांच्या नावावर खरेदी झाली. काही घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या नावावरदेखील कर्ज घेण्यात आले. कर्ज देणाऱ्या पतसंस्था आणि बॅंकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर बॅंकांनी चौकशी केली असता, कर्मचाऱ्यांकडून आम्ही कुठलेही कर्ज घेतले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बॅंकांनी कर्ज वसुलीचा तगादा लावला. महापालिकेने वादग्रस्त ठेका काढून घेतला. बॅंकांनी वसुलीसाठी रामरावची मालमत्ता जप्त केली. या प्रकरणात कर्मचाऱ्यांनी सफाई कामगार आयोगाकडे तक्रार केली होती. सफाई कामगार आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष बुटासिंग हे चौकशीसाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. बुटासिंग यांच्या मुलाला रामरावकडून लाच मागितल्या प्रकरणी अटक केली होती. आता पोलिस या दोघांचा कसा तपास करतात, त्यांना साथ देणारे कसे शोधतात, याकडे शहर आणि जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत. 

पन्नास कोटींची वदंता 
पोलिसांनी बनावट नोटांसह 11 जण आणि तीन वाहने पकडली असली, तरीही बनावटगिरीच्या उद्योगात 15 वाहने असल्याचा संशय पोलिसांना आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दुसऱ्या दिवसापासून "काळ्याचे पांढरे' करण्याचा "धंदा' तेजीत आल्याची माहिती पोलिसांपर्यंत धडकली आहे. जवळपास 50 कोटींच्या नोटा बाजारात आणण्याचे षडयंत्र रचले गेल्याची चर्चा शहरभर पसरली आहे. बनावटगिरीच्या "धंद्या'साठी सहकारी संस्थेचा वापर केला तर गेला नाही ना, या प्रश्‍नाने रान उठविले आहे. 

Web Title: chhabu nagar case