महायुतीच्या समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांनी बोलवावी बैठक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

नाशिक - भारतीय जनता पक्ष प्रणीत महायुतीने एकत्र निवडणूक लढवावी, अशीच आमची भूमिका आहे.

नाशिक - भारतीय जनता पक्ष प्रणीत महायुतीने एकत्र निवडणूक लढवावी, अशीच आमची भूमिका आहे. महायुतीच्या घटक पक्षांच्या समन्वय समितीची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात निर्णय घ्यावा, चर्चेतून अनेक प्रश्‍नांबाबत मार्ग निघू शकतो, आमच्या कुठल्याही अटी-शर्ती नाहीत, मतविभागणीमुळे होणाऱ्या नुकसानीचा भाजपने विचार करायचा आहे, अशा शब्दांत भाजपला चुचकारण्याबरोबरच जिल्हा परिषद व महापालिका निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम संघटना स्वतंत्र आघाडी करून लढविणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी व शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीबाबत भाजप व शिवसेना यांच्यात चर्चा सुरू आहे. महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम संघटना यांचा विचारही केला जात नसल्याने त्यांनी एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या स्वतंत्र लढण्यामुळे मतांच्या विभागणीचा विचार भाजपने करायचा आहे, असेही खासदार शेट्टी व आमदार मेटे यांनी स्पष्ट केले. भाजप व शिवसेनेने आम्हाला त्यांच्या चर्चेत सहभागी करून घ्यावे, असा आमचा आग्रह नाही; पण श्रावणबाळासारखे किती दिवस कावड घेऊन फिरायचे, अशी आमची भूमिका असल्याचा टोला त्यांनी मारला. 

खासदार शेट्टी म्हणाले, की महायुतीच्या घटक पक्षांचा पक्षविस्तारासाठी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय तत्त्वतः झालेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार असून, शहरी भागात या घटक पक्षांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जिल्हा परिषद निवडणुकीत या लहान पक्षांचा ज्या भागात प्रभाव असेल, तेथे दुसरे पक्ष त्यांना पाठिंबा देणार, या धोरणावर ही आघाडी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

"शिवसंग्राम'चा लवकरच नवा राजकीय पक्ष 
शिवसंग्राम या नावाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिल्याने "शिवसंग्राम'ने नवीन राजकीय पक्षाची नोंदणी केली असून, पुणे येथे 20 जानेवारीला या पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती आमदार मेटे यांनी दिली.

Web Title: The Chief Minister to call a meeting of the Coordination Committee of the alliance