राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

जाणाऱ्यांनी खुशाल जावे
काँग्रेस पक्ष म्हणजे गांधींचा, तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवारांचा पक्ष असे म्हटले जाते. परंतु भारतीय जनता पक्षात कोणतीही घराणेशाही नाही. पक्षात मी म्हणजे पक्ष असे ज्यांना वाटत असेल, त्यांनी पक्ष सोडून गेले तरी कोणताही फरक पडणार नाही, असा इशारा श्री. महाजन यांनी दिला. पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना उद्देशून ते बोलत होते.

जळगाव - राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की शिवसेनेचा, असा वाद सुरू असतानाच जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता थेट मुख्यमंत्रिपदाचे नावच जाहीर केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्याप्रमाणे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज्यातील जनतेचीही हीच इच्छा आहे, असे प्रतिपादन श्री. महाजन यांनी जळगाव येथे पक्षाच्या बैठकीत केले. यावेळी पक्षाचे नेते एकनाथराव खडसे उपस्थित होते. 

जळगाव येथील ब्राह्मण सभेत भाजपची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजीव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ, संजय सावकारे आदी उपस्थित होते. 

आघाडीला फक्त ५० जागा
श्री. महाजन म्हणाले, की मी सांगितलेला निवडणुकीतील जागांचा आकडा कधीही खोटा ठरत नाही. जळगाव, धुळे आणि नाशिक महापालिका निवडणुकीत मी भाजपला एवढ्या जागा मिळणार, असे सांगितले होते. अगदी तेवढ्याच जागा पक्षाला मिळालेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतही आपण युतीला एवढ्या जागा मिळणार असे सांगितले, तेवढ्याच जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे आपण आता विधानसभेचेही गणित जाहीरपणे सांगत आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षाला ५० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत म्हणजे नाहीतच.

आपण हा आकडा आज जाहीर केला आहे. विधानसभा निवडणूक लागल्यानंतर या आकड्यात वाढ तर होणारच नाहीच, परंतु पुन्हा हा आकडा कमीच होईल, त्यावेळी कमी झालेला तो आकडाही आपण जाहीर करू.

कार्यकर्त्यांवर चालतो पक्ष
मंत्री महाजन म्हणाले, की लोकसभेत पक्षाला जनतेने मोठ्या प्रमाणात यश दिले आहे. परंतु निवडणुकीच्या काळात आपलेच काही लोक आपलं काही खरं नाही, असे ‘निगेटिव्ह’ बोलत होते. मात्र, जनतेने मोठ्या प्रमाणात यश दिले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निगेटिव्ह विचार टाळले पाहिजे. माजी खासदार ए. टी. पाटील यांना दोन वेळा निवडून दिले. परंतु, यावेळी जनतेने त्याच मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांना निवडून दिले. ए. टी. पाटील गेले, परंतु पक्ष हा कायम राहिला आहे. त्यामुळे कोणीही ‘मी म्हणजे पक्ष’ असे समजूच नये. पक्ष नेत्यांवर नव्हे, तर कार्यकर्त्यांवर चालत असतो. पक्ष आपली खासगी प्रॉपर्टी आहे, असे तर नेत्यांनी मुळीच समजू नये. लोकसभेत जनतेने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवून पक्षाला निवडून दिले. त्यांनी जात, पात, धर्म पाहिला नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही जनता भाजपलाच निवडून देईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis Girish Mahajan Politics