मुख्यमंत्र्यांचे नागपूर "क्राइम कॅपिटल' - सुळे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

नाशिक - नागपूर हे सुसंस्कृत आणि मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. मात्र नागपूरमधील आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणे नागपूर शहर "क्राइम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र' असे झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली. या अत्याचारच्या घटनेच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली. 

उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक बैठका आटोपून खासदार सुळे यांनी राष्ट्रवादी भवनात विविध आघाड्यांच्या बैठका घेतल्या. त्यात मागील निवडणुकीतील यशापयशाबद्दल चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ""आमचे नेते शरद पवार हे पंचवीस वर्षे सत्तेत होते. पंचवीस वर्षे विरोधात राहिलेत. त्यामुळे यशापयशाबद्दल आत्मचिंतन करायला हवे. ते आम्ही करतो. संघटना म्हणून कुठे कमी पडलो, याचा विचार केला आहे. आम्ही आता विरोधात असलो, तरीही सामान्यांना न्याय देण्याचे काम करीत आहोत. टिकून राहणारे निष्ठावंत कार्यकर्ते पुढे जाताहेत. 

उद्धव ठाकरेंसह शिवसेना संभ्रमावस्थेत आहेत, असे टीकास्त्र खासदार सुळे यांनी सोडले. शिवसेनेने सत्ता सोडण्याची हिंमत दाखवावी, याचाही पुनरुच्चार केला. तसेच, पंतप्रधानांची मुख्यमंत्री कॉपी करतात, असे त्यांनी सांगितले. विरोधक असतानाची आणि आता सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल किती भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलल्याचे महाराष्ट्र पाहतोय, असे सांगत त्यांनी कर्जमाफीसाठी आणखी किती आत्महत्यांची प्रतीक्षा सरकार करणार आहे, असा प्रश्‍न करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांच्या प्रश्‍नांवर सरकार मार्ग काढणार की नाही, अशी पृच्छा केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संघर्षयात्रेत शिवसेना सहभागी झाल्यास स्वागत असेल, असेही त्यांनी नमूद केले. 

लाल दिव्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, की लाल दिव्यापेक्षाही कर्जमाफी महत्त्वाची आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती म्हणून कोण मिरवते, याचा विचार जनतेने करायचा आहे. आम्ही सत्तेत असू अथवा नसो, सामान्य माणसाप्रमाणे वागतो. सार्वजनिक ठिकाणी कामांसाठी रांगेत उभे राहतो.

Web Title: Chief Minister's Nagpur Crime Capital