चिखली-तरसोद टप्प्यातील काम एप्रिलमध्ये होणार सुरु

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

जळगाव - महामार्ग चौपदरीकरणातील चिखली ते तरसोद या टप्प्यातील प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यात एप्रिलमध्ये सुरवात होणार आहे. बुधवारी मुंबईत खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत या कामाच्या आढाव्यासंदर्भात झालेल्या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, मक्तेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

जळगाव - महामार्ग चौपदरीकरणातील चिखली ते तरसोद या टप्प्यातील प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यात एप्रिलमध्ये सुरवात होणार आहे. बुधवारी मुंबईत खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत या कामाच्या आढाव्यासंदर्भात झालेल्या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, मक्तेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर चिखली ते तरसोद या ६२.७ किलोमीटर व तरसोद ते फागणे या ८७.३ किलोमीटर टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. दोघा कामांसाठी दोन स्वतंत्र एजन्सीच्या निविदा मंजूर असून महिनाभरात या कामांना सुरवात होण्याची शक्‍यता आहे. यातील चिखली ते तरसोद या टप्प्याचे काम विश्‍वराज इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीला देण्यात आले आहे.

चिखली ते तरसोद या खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघातील टप्प्यातील कामाबाबत त्यांनी आज मुंबईत न्हाईच्या अधिकाऱ्यांसह मक्तेदार कंपनीच्या प्रतिनिधींकडून आढावा घेतला. तसेच चौपदरीकरणासह या टप्प्यातील शहरे व विविध गावांचे ॲपरोच रोड, त्यातील काही तांत्रिक बदल, कोणत्या ठिकाणी कसे रस्ते अपेक्षित आहे, याबाबत सूचना केल्या. चौपदरीकरणाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्याआधी मक्तेदार एजन्सीचे अधिकारी नव्याने या टप्प्याची पाहणी करतील, आणि कामाच्या टप्प्यात आणखी कोणत्या बाबी आवश्‍यक आहेत, त्याचा कामात समावेश करतील. काम सुरु करण्याच्या दृष्टीने कंपनीची यंत्रणा महिनाभरात प्रत्यक्ष कामाच्या जागेवर कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कामाचे स्वरुप मोठे असल्याने या टप्प्यात दोन-चार ठिकाणी कंपन्यांची यंत्रणा उभारण्यासाठी जागेची उपलब्धताही करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत परवानगी दिली असून आता प्रत्यक्ष काम सुरु होण्याचीच प्रतीक्षा आहे. 

फेकरीचा टोल बंदबाबत पत्र
चौपदरीकरणाचे काम सुरु होत असल्याने सध्या भुसावळच्या पुढे फेकरी उड्डाणपुलावर घेतला जाणारा टोल बंद करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात येणार असल्याचे रक्षा खडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. चौपदरीकरणाच्या कामाला पुढील महिन्यात सुरवात होईल, काम चांगल्या दर्जाचे व सुविधांनी परिपूर्ण होण्याबाबत या संपूर्ण कामावर लक्ष ठेवले जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

Web Title: chikhali-tarsod highway work