बालमृत्यूंचे प्रमाण अतिसारामुळे अधिक

प्रशांत कोतकर
सोमवार, 29 जुलै 2019

‘अतिसार’ या रोगाची प्रमुख कारणे - 
विषाणू रोटावायरस, एंटरोवायरस, ॲडेनोवायरस (Viral Diarrhoea) 
जीवाणू - इकोलाय, व्हिब्रोओ कॉलरा, शिगेला (Bacteria) 
परजीवी - अमिबिआसीस, जिआर्डीआसीस (Parasite)

नाशिक - पावसाळ्यात मुलांना दूषित अन्न व पाण्यातून अनेक प्रकारचे साथीचे रोग होत असतात. यात प्रामुख्याने कावीळ, विषमज्वर, अतिसार या रोगांचा समावेश होतो. यात जगभरात पाच वर्षांखालील १५ लाख बालकांचा मृत्यू अतिसारामुळे होतो. ‘अतिसार’ हा रोग बालकांच्या मृत्यूच्या कारणात क्रमांक दोनवर आहे. हे प्रमाण कमी व्हावे यासाठी दरवर्षी २९ जुलैपासून इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्‍स (IAP) च्या वतीने ओआरएस (जलसंजीवनी) सप्ताह साजरा केला जातो.  

बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी शासन आपल्या परीने प्रयत्न करीत असले, तरी यात आपलीही भूमिका महत्त्वाची असल्याची जाणीव ठेवत इंडियन ॲकॅडमी आफ पेडियाट्रिक्‍सने ओआरएस सप्ताह पाळण्यास सुरवात केली. यात ओआरएसबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे, अतिसाराचा उपचार योग्य पद्धतीने करणे, ओआरएस व झिंक सर्वत्र मुबलक पद्धतीने उपलब्ध ठेवणे व सर्वांना त्याबद्दल माहिती देऊन ते बनविण्याचे कौशल्य इतरांना शिकविण्याचे काम असोसिएशनच्या वतीने केले जाते.

प्रमुख लक्षणे 
सर्दी, खोकला, ताप, मळमळ, उलट्या, त्यानंतर वारंवार पाण्यासारखे पातळ जुलाब. जसजसे जुलाबाचे प्रमाण वाढते तसतसे निर्जलीकरणास (dehydration) सुरवात होते. निर्जलीकरणाची प्रक्रिया कुपोषित बालकांमध्ये जास्त वेगाने घडते.

धोक्‍याची लक्षणे  
कुपोषण, तीन महिन्यांपेक्षा लहान बाळ, १० टक्के किंवा त्यापेक्षा वजनात घट, नुकतेच गोवर किंवा इतर संक्रमित रोगाची लागण झालेले बाळ, पोट फुगणे, संडासमध्ये रक्त पडणे, आठ तास किंवा यापेक्षा जास्त वेळ लघवी न होणे, बेशुद्ध होणे व झटके येणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Death Percentage Increase by Diarrhea Sickness Healthcare