Child Marriage : तीन बालविवाह रोखले...! हडसुणेतील प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child Marriage Police registered case against ten people kej

Child Marriage : तीन बालविवाह रोखले...! हडसुणेतील प्रकार

धुळे : बालविवाहाबाबत निनावी फोन, शिवाय अन्य चर्चेतून माहिती मिळाल्यावर जिल्ह्यात तीन बालविवाह (child marriage) रोखण्यास बालसंरक्षण समितीला यश आले. (Child Protection Committee succeeded in preventing 3 child marriages dhule news)

विशेष म्हणजे हडसुणेत (ता. धुळे) दोन अल्पवयीन बहिणींचा दोन अल्पवयीन मुलांसोबत एकाच मांडवात गुरुवारी (ता. ९) बालविवाह होणार होता. तो रोखण्यात समितीसह यंत्रणेला यश आले. नागरिकांनी असे काही प्रकार निर्भिडपणे कळविल्यास बालविवाह रोखता येऊ शकतील, असे समितीने सांगितले.

हडसुणे येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची निनावी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळाली. ही माहिती चाइल्ड लाइनच्या १०९८ या हेल्पलाइनवर प्राप्त झाली. त्यानुसार तत्काळ पावले उचलत उचित कार्यवाही केल्याने अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण समितीस यश आले.

पथक, पोलिस हडसुणेत

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षा अधिकारी राकेश नेरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांनी समन्वयातून जिल्हा बालसंरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी तृप्ती पाटील (संस्थात्मक) व संरक्षण अधिकारी देवेंद्र मोहन (संस्थाबाह्य), चाइल्ड लाइनच्या प्रतिनिधी प्रतीक्षा शिरसाट यांचे पथक तयार केले.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

ते हडसुणे येथे कार्यवाहीसाठी दाखल झाले. तेथील पोलिसपाटील, ग्रामसेवक, सरपंचांशी संपर्क साधला. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या प्रकरणी तत्काळ दखल घेत सुनील जावरे यांच्या सहकार्याने हडसुणे गाठले.

मुलाचा विवाह रोखला

हडसुणेत आणखी एका अल्पवयीन मुलाचा साखरपुडा झाल्याची माहिती समितीला मिळाली. त्यानुसार संबंधित ठिकाणी बालविवाह रोखण्याबाबत संबंधित मुलाच्या कुटुंबाला कायद्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे हा बालविवाह रोखण्यास यश आले.

जिल्हा परिषद सदस्या पाटील, सरपंच भीमराव पगारे, ग्रामसेवक एस. आर. उदीकर यांच्या सहकार्याने तीन बालविवाह रोखण्यात यश आल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले. याकामी सीईओ बुवनेश्वरी एस., श्री. शिंदे, पोलिस निरीक्षक शिंदे व पथकाने परिश्रम घेतले.

हमीपत्रासह समुपदेशन

बालविवाह ठिकाणी जन्म पुराव्याची तपासणी केली असता संबंधित मुलगी १८ वर्षांखालील असल्याचे पथकाला खात्री पटली. संबंधितांच्या घरी वर व वधूपक्षाला एकत्रित बसवून बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार होणाऱ्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली.

वडिलांकडून मुलीचे १८ वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय तिचा विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेण्यात आले. तसेच संबंधित मुलीचे समुपदेशन करण्यात आले. हडसुणेत गुरुवारी दोन अल्पवयीन बहिणींचा दोन अल्पवयीन मुलांसोबत एकाच मांडवात होणारा बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश मिळाले.