कचरावेचक मुलांसाठी "ते' बनले "दूत' 

children's day jalgaon
children's day jalgaon

जळगाव ः देशात आजही अनेक मुलांना परिस्थितीअभावी शिक्षण घेता येत नाही. मग ती कचरा वेचून गुजराण करणारी असोत, की भीक मागून पोटाची खळगी भरणारी...अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्याचा विडा येथील वर्धिष्णू सोशल रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट सोसायटीने उचलला आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे 250 हून अधिक अशा वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना व्यसनापासून दूर करण्यात यश मिळविले आहे. 
अद्वैत दंडवते, त्यांची पत्नी प्रणाली सिसोदिया यांनी सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उपाययोजना करण्याच्या हेतूने "वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी' संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी अस्वच्छ काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले. "सक्षम' या उपक्रमाच्या माध्यमातून ते असंघटित कामगारांच्या स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी त्यांनी "अपना घर' संकल्पना सुरू करून शाळेच्या प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. संस्थेच्या माध्यमातून शहरातील कचरावेचक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानंतर "आनंदघर' या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. आनंदघराच्या माध्यमातून कचरा वेचणारे, बालमजूर मुलांना सुरक्षित व आनंददायी बालपण मिळावे, यासाठी वस्ती-पातळीवर केंद्रे चालवली जातात. गेल्या 5 वर्षांच्या काळात 250 पेक्षा जास्त मुला-मुलींना शाळांमध्ये दाखल करण्यात तसेच तिथे टिकवून ठेवण्यात संस्थेला यश आले आहे. 
आज जळगावातील 3 केंद्रांमध्ये 120 मुले-मुली दररोज शिक्षण घेत आहेत. 

प्रत्येक मुलाची कथा वेगळी 
आनंदघराच्या संपूर्ण प्रक्रियेतून गेलेल्या प्रत्येक मुलाची कथा वेगळी. अडचणी, आवडी-निवडी वेगळ्या. प्रत्येकात कुठली तरी कला दडलेली. अडचणींवर मात करत काही मुले संपूर्ण प्रक्रियेत टिकून राहिली. नुसती टिकलीच नाहीत, तर त्यांनी स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

मुलांना व्यसनातून केले मुक्त 
"आनंद घर'मधील काही बालके व्यसनाच्या आहारी गेली होती. त्यांना व्यसनाधिनतेतून बाहेर काढून आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी प्रेरणा दिली आहे. बालके अस्वच्छ राहत होती. बालकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करून त्यांना स्वच्छता ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. यामुळे त्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे. याकामी अनिता साळवे, भावना करंदीकर, विजया रंधे, रवीना सोनवणे, मंगला जाधव, अभिषेक संधानशिव यांचे सहकार्य मिळते. 
 
शाळाबाह्य मुलांना सुरक्षित व आनंददायी बालपण मिळावे, यासाठी विविध वस्त्यांवर केंद्रे चालवली जातात. 5 वर्षांत 250 पेक्षा जास्त मुला-मुलींना शाळांमध्ये दाखल करण्यात आले. शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया आनंददायी करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आगामी काळात 12 "आनंदघर' निर्माण करून हुडको, समतानगर आदी वंचित भागातील शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचा संकल्प आहे. 
- अद्वैत दंडवते, अध्यक्ष वर्धिष्णू सोशल रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट सोसायटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com