माळमाथा परिसरात शेतकऱ्यांसह बालगोपालांचे पावसाला साकडे

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

शेतकऱ्यांसह बालगोपालांनी रात्रंदिवस 'धोंड्या धोंड्या पाणी दे, सायमाय पिकू दे. धोंड्या खवयना, पाणी ववयना!' अशी अहिराणी भाषेत आर्त विनवणी करत पावसाला साकडे घातले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकटही बळीराजाच्या डोळ्यासमोर उभे ठाकले आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणेसह संपूर्ण तालुक्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा असून मोजून एक-दोनदा झालेल्या पावसानंतर आजतागायत परिसरात मोठा पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांसह बालगोपालांनी रात्रंदिवस 'धोंड्या धोंड्या पाणी दे, सायमाय पिकू दे. धोंड्या खवयना, पाणी ववयना!' अशी अहिराणी भाषेत आर्त विनवणी करत पावसाला साकडे घातले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकटही बळीराजाच्या डोळ्यासमोर उभे ठाकले आहे.

ज्येष्ठ महिन्यात एक-दोन पाऊस बऱ्यापैकी झाले. परंतु त्यानंतर आषाढी एकादशीला झालेल्या रिमझिम पावसानंतर संपूर्ण आषाढ महिन्यात एकही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाऊस नसल्याने पिके करपू लागली आहेत. जे छोटे-मोठे बागायतदार शेतकरी आहेत व ज्यांच्या विहिरीला अथवा कुपनलिकेला थोडयाफार प्रमाणात पाणी आहे असे शेतकरी कोमेजलेली पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु जे कोरडवाहू शेतकरी आहेत त्यांचा मात्र पिकांचा विषय संपल्यात जमा आहे. त्यांना दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांतून पीककर्ज मिळाले आहे पण काहींना अजूनही मिळाले नसल्याचे समजते. सद्या 'गवार' व 'साठवलेला कांदा' वगळता इतर शेतमालास बाजारपेठेतही रास्त भाव मिळत नसल्याने बळीराजाची अस्मानी-सुलतानी संकटांनी पुरती गोची केली आहे. येत्या श्रावण महिन्यात जर पाऊस झाला नाही. तर दुष्काळाचे सावट निश्चित आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने सद्या शेतीची कामेही ठप्प झाली असून शेतमजुरांच्याही हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. शासन-प्रशासनाने याबाबत वस्तुनिष्ठ पाहणी करणे आवश्यक असून आगामी काळात पिकांची आणेवारी लावताना ती पन्नास पैशांच्या आत लावणे अत्यंत गरजेचे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदानाची तरतूद करणेही आवश्यक आहे.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Children Pray for rain in malmatha area dhule