शाळामास्तरकडूनच मुलांच्या लैंगिक शोषणाचा प्रकार

शाळामास्तरकडूनच मुलांच्या लैंगिक शोषणाचा प्रकार

जळगाव - शहरातील एका नामवंत संस्थेच्या शाळेत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांवर शिक्षकाकडूनच अत्याचार केला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलांच्या पालकांनी शाळेत येऊन धिंगाणा घालत प्राचार्यांच्या दालनात या विकृत मास्तरला बेदम झोडपल्याची घटना शुक्रवारी (9 डिसेंबर) घडली. घटस्फोटित असलेल्या संशयित शिक्षकाने यापूर्वीही असाच प्रकार केल्याची खात्रीलायक माहिती समोर येत असून, संस्थेतर्फे अद्याप कुठलाही ठोस निर्णय यासंदर्भात घेतला जात नसल्याने चार भिंतींत झालेल्या मांडवलीची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे.


शहरातील प्रसिद्ध आणि नामवंत संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या एका मराठी शाळेत पौगंडावस्थेतील मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्‍यातील नशिराबाद येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्यांपैकी एक दहावीतील व दुसरा नववीत शिक्षण घेत असल्याची माहिती "सकाळ'ला प्राप्त झाली आहे. प्राप्त सूत्र आणि खात्रीलायक माहितीच्या आधारे या शाळेतील सांस्कृतिक शिक्षक असलेल्या विकृताला त्याच्या पत्नीने याच कारणामुळे काही वर्षांपूर्वी सोडचिठ्ठी दिली आहे. तेव्हापासून या विकृताने वाममार्ग धरल्याची चर्चा सहकारी शिक्षकांमध्ये आहे.

दोघांचे शोषण
दहावीत शिक्षण घेणारा श्‍याम (काल्पनिक नाव) यास पास करून देण्याचे व परीक्षेत सर्व काही मदत देण्याचे आमिष दाखवून या विकृताने अत्याचार केला. घडल्या प्रकाराने भेदरलेल्या विद्यार्थ्याने कोणालाही न सांगता गप्प राहण्याचा निर्णय घेत आजारी म्हणून शाळेत जाणेच टाळले. मात्र, त्याचा मित्र रोज शाळेत येतो हाच का येत नाही, म्हणून या शिक्षकाने त्याच्या मित्राला गाठून मोबाईलमधील अश्‍लील चित्रफिती दाखवून बळजबरीचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थ्याला संकटाची चाहूल लागताच त्याने रडण्यास सुरवात केल्याने तो वाचला.

असे फुटले "बिंग'
त्या दिवशी शिक्षक महाशय थेट गावापर्यंत मुलाला सोडण्यासाठी आले असता या मुलाने घरी न जाता मित्राचे घर गाठले व त्याला घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा त्याच्या मित्राने आपल्यावर ओढवलेला प्रकार त्याला सांगितल्याने तो अधिकच घाबरला. इतक्‍यात मुलगा अजून घरी का येत नाही म्हणून त्याची आई त्याच्या शोधात निघाली. आईने रागावल्यावर घरी गेल्यानंतर उशिराचे कारण मुलाने आईला सांगितले व आपल्या त्या मित्रासोबत काय झाले तेही सांगून टाकले. पायाखालून जमीन सरकताच पहिल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना बोलावून घेण्यात येऊन तुमचा मुलगा शाळेत का जात नाही, याचे कारण व घडलेली घटना सांगण्यात आली.

शुक्रवारी धिंगाणा
घडल्या प्रकाराने तळपायाची आग मस्तकाला भिडलेल्या कुटुंबीयांनी शाळा गाठली. शुक्रवारी (9 डिसेंबर) शाळेच्या प्रचार्यांना भेटून यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्या विकृत शिक्षकालाही बोलाविण्यात आले. संताप अनावर होऊन गावठी पद्धतीनेच त्याला पालकांनी दालनात बेदम झोडपले.

कायद्याच्या चौकटीत मांडवली
घडलेला किळसवाणा प्रकार उघडकीस आला, तर संस्थेची इतक्‍या वर्षांची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, शाळा बदनाम होईल म्हणून पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लिखित स्वरूपात आमची काहीही तक्रार नसल्याचे लिहून घेत मांडवली करून प्रकरण दडपल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. मात्र, दुसरा पीडित व यापूर्वीही घडलेल्या प्रकारातील पीडित विद्यार्थ्यांबाबत असे काही लिहून घेण्यात आलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com