कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 जून 2018

कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले 
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी ते पाळधीदरम्यान आज सायंकाळी वाहतुकीची कोंडी झाली होती. बांभोरी पुलावर नादुरुस्त झालेल्या वाहनामुळे दूरवर दुतर्फा लांबच लांब रांगा होत्या. वाहतूक कोंडीतून मार्ग काढत असलेल्या दुचाकीस्वारास दहाचाकी कंटेनरने चिरडले. ही घटना आज रात्री साडेआठच्या सुमारास विद्यापीठाजवळील हॉटेल रोहिणीजवळ घडली. पोटावरून कंटेनरचे चाक गेल्याने दुचाकीस्वार अनिल छगन नन्नवरे (वय 35) जागीच ठार झाले. 

बांभोरी (ता. धरणगाव) येथील मूळ रहिवासी तथा नारायणगाव (पुणे) येथे एसटी चालक असलेले अनिल छगन नन्नवरे (वय 35) एका दिवसाच्या सुटीवर सोमवारीच घरी (बांभोरी) आले होते. पूर्ण दिवस कुटुंबासह घालविल्यानंतर ते बुधवारी कामावर परतणार होते. आज सायंकाळी ते कामानिमित्त पाळधी येथे गेले. रात्री साडेआठच्या सुमारास परतत असताना महामार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाली म्हणून अनिल नन्नवरे यांनी दुचाकी साइडपट्टीवरून नेण्याचा निर्णय घेतला. बाजूने दुचाकीवर जात असताना कंटेनरचा धक्का लागला आणि त्याच्या दोन्ही चाकांच्या मधोमध ते पडले. दहाचाकी कंटेनरचे मागील चाक अनिल नन्नवरे यांच्या पोटावरून गेले. त्यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. कंटेनरवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात संतप्त ग्रामस्थ असतानाच पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत पाळधी पोलिस दूरक्षेत्रात रवाना केले. अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

पुतणीचा वाढदिवस अन्‌ अप्रिय घटना 
अनिल नन्नवरे यांच्या पुतणीचा सोमवारी (11 जून) वाढदिवस होता. संपूर्ण कुटुंबाने आनंदात वाढदिवस साजरा केला. एक- दोन दिवस कुटुंबासह घालवून उद्या सकाळी गाडीने निघण्यापूर्वी किरकोळ कामे आटोपून ते निघणार होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू ओढवला. 

कुटुंबीयांचा आक्रोश 
अनिल नन्नवरे हे पुण्यात नोकरीला असून, बांभोरीत त्यांचे घर आहे. कुटुंबात पत्नी कल्पना, मुलगा मोहित, मुलगी लक्ष्मी, आई-वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार असून, अनिल नन्नवरे यांच्या मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. 
 
Web Title: chiradle