अतिक्‍लोरिनमुळे नाशिककरांच्या जिवाशी खेळ

विक्रांत मते
गुरुवार, 11 जुलै 2019

पावसाळ्यात अधिक डोस
धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस पडत असताना धरणात संकलित होणारे पाणी गढूळ तर असतेच. त्याशिवाय मृत मासे, जिवाणू, जनावरेदेखील पाण्याबरोबर वाहून येतात. ते पाणी निर्जंतुक करूनच शहरात पुरवठा करावा लागतो. त्यामुळे क्‍लोरिनचा अधिक डोस द्यावा लागतो, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विभाग व तासानुसार क्‍लोरिनचा डोस दिला जातो. पाण्याचे दहा ते बारा नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासण्यासाठी दिले जातात. सध्या पाण्याला दर्प येत असेल तर मुकणे धरणातून या वर्षांपासून पाणी उचलले जात आहे. अठरा किलोमीटरची नवीन पाइपलाइन असल्याने पाइपमधील कोटिंगसुद्धा पाण्याबरोबर वाहून येत असल्याने त्याचा दर्प असू शकतो, असा अंदाज आहे. पण क्‍लोरिनचा डोस प्रमाणानुसारच दिला जात असल्याचा दावा करण्यात आला. जलकुंभ, लिकेज आदीमुळे क्‍लोरिन उडून जात असल्याने पाणी निर्जंतुक करणे गरजेचे असल्याने त्यानुसार अधिकचा डोस दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

नाशिक - शहराला सध्या कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यातही जे पाणी नळांना येते त्यालाही उग्र वास येत असल्याने पाण्यात क्‍लोरिन अधिक वापरले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणी शुद्धीकरणासाठी अधिक क्‍लोरिनचा वापर होत असला, तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरणातून रोजचे दहा दशलक्ष घनफूट, दारणातून दीड ते दोन दशलक्ष घनफूट व यंदापासून मुकणे धरणातून रोजचे ५० ते ६० दशलक्ष घनफूट पाणीउपसा केला जाता. तिन्ही धरणांतून कच्च्या स्वरूपात पाणी (रॉ वॉटर) जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. त्यासाठी महापालिकेने सात जलशुद्धीकरण केंद्रांची निर्मिती केली आहे. 

जलशुद्धीकरण केंद्रांवर गढूळ पाणी स्वच्छ केले जाते. ते निर्जंतुक करण्यासाठी क्‍लोरिनचा वापर होतो. क्‍लोरिन हा उडणारा पदार्थ आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रांवर १.५ ते २ पीपीएम (पार्टस पर मिलियम)चा डोस दिला जातो.

जलशुद्धीकरण केंद्रावरून जलकुंभ व पुढे घरोघरी पाणी पोचत असताना क्‍लोरिनचा पाण्यातील घटक कमी होतो. शेवटच्या घरापर्यंत पाणी पोचत असताना पाण्यातील क्‍लोरिनचे प्रमाण हे ०.१ ते ०.२ पीपीएम असावे, असे सूत्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून लावले जाते. पाण्यात क्‍लोनचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार निश्‍चित करण्यात आले आहे.

शहरातील जलशुद्धीकरण केंद्रे
बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, गांधीनगर, निलगिरी बाग, नाशिक रोड, विल्होळी.

पाणी निर्जंतुक करणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी क्‍लोरिनच्या डोसचे प्रमाण कमी-अधिक करावे लागते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानांकनानुसार शहरातील पाण्यात क्‍लोरिनचा डोस दिला जातो.
- संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

पाण्यात क्‍लोरिनचे प्रमाण ४ पीपीएमपेक्षा जास्त होऊन शरीरात प्रवेश झाल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. क्‍लोरिन व पाण्यात प्रक्रिया होऊन फ्रीरेडिकल्स तयार होतात. त्यातून शरीरातील अनेक पेशी नष्ट होतात. याचे प्रमाण वाढत राहिल्यास कर्करोगाची शक्‍यता वाढते. यूएस कौन्सिल ऑफ एनव्हायरमेंट क्वालिटीनुसार क्‍लोरिनयुक्त पाणी वापराने ब्लॅड कॅन्सर, रेक्‍टम कॅन्सर होतो. गॅस स्वरूपातील क्‍लोरिन सर्वांत जास्त धोकादायक ठरतो. श्‍वास व फुफ्फुसामार्फत रक्तात पोचून शरीराची हानी होते. लहान मुलांमध्ये अस्थमा, ब्रान्कायटिसचे क्‍लोरिन गॅस हे एक कारण आहे. घसा खवखवणे, डोळे लाल होऊन चुरचुरणे, श्‍वसनाचा त्रास, खोकला आदी प्रकारचा त्रास होतो. त्वचा कोरडी पडणे, एक्‍झमा यांसारखी लक्षणे दिसतात. पण जंतूद्वारे होणाऱ्या आजारांची भयावहता लक्षात घेता क्‍लोरिनचे महत्त्व डावलता येणार नाही.
- प्रा. प्रणिता वाघ, जीवशास्त्र विभागप्रमुख, केटीएचएम महाविद्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chlorine Water Purification Nashik Public Life Danger