उन्हापासून बचावासाठी नागरिकांची कापड दुकानांत गर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

नागरिक वाढत्या उन्हाच्या चटक्‍यापासून बचाव करण्यासाठी रूमाल, स्टोन, गमजे आणि स्कार्प चेहऱ्याभोवती गुंढाळत सरसावले आहेत. उन्हाच्या तीव्रतेने रूमाल, स्टोन, गमजे आणि स्कार्पला मागणी वाढली असून सध्या दररोज मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे.

खामखेडा (नाशिक) - गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज तापमानात वाढ होत आहे. हे वाढते तापमान कमी होण्यासाठी आणखी दीड महिना कालावधी लागणार आहे. उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. नागरिक वाढत्या उन्हाच्या चटक्‍यापासून बचाव करण्यासाठी रूमाल, स्टोन, गमजे आणि स्कार्प चेहऱ्याभोवती गुंढाळत सरसावले आहेत. उन्हाच्या तीव्रतेने रूमाल, स्टोन, गमजे आणि स्कार्पला मागणी वाढली असून सध्या दररोज मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे.

मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. वाढत्या तापमानाचे चटके बसू लागल्याने तापमानापासून बचाव करण्यासाठी रूमाल, स्टोन, उपरणे, पांढरे कापड यांचा वापर नागरिक करू लागले आहेत. 

वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी स्कार्पला मुलींकडून मोठी मागणी आहे. सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव या शहरांत दररोज हजाराहुन अधिक स्टोन, स्कार्फ, उपरणे, हातरुमाल, पांढरे कापड यांची विक्री होत आहे.

उन्हाळा आला म्हटलं की लहान मुलं टोपीसाठी आई-वडिलांकडे हट्ट करतात. दिवसभरात साधारणता तीनशे ते चारशे टोप्यांची विक्री होत आहे. वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी महिला स्कार्फला अधिक पसंती देत आहेत. त्याचबरोबर वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी युवक हातरूमालाला पसंती दाखवत आहेत. 

सटाणा व देवळा या शहरातून दररोज चारशे ते पाचशे रूमालांची विक्री होत असल्याचे देवळा येथील आशीर्वाद कापड दुकानाचे संचालक अशोक राणे यांनी सांगितले आहे.

रूमाल, टोपी, गमजा, स्टोन आणि स्कार्पची मुंबई, सुरत, उस्मानाबाद आणि इंदौर या शहरातून आवक होते. तर उपरणे, मालेगाव, येवला व मुंबई या ठिकाणाहून आवक होते. सध्याच्या तापमानापेक्षा ही पुढील काळात तापमान वाढणार असल्यामुळे रूमाल, टोपी, स्टोन, हातरुमाल आणि स्कार्पचे दर वाढतील. - मनोहर मोरे, तुळजाई कलेक्शन देवळा

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Citizens save themselves from heat