शहराचे पालकत्व आजपासून भाजपच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

नाशिक - शहराच्या पंधराव्या महापौर व उपमहापौरपदासाठी उद्या (ता. 14) निवडणूक होत आहे. सकाळी अकराला निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होईल. महापौर व उपमहापौरपदासाठी विराजमान होण्यासाठी लागणारे संख्याबळ भाजपकडे असल्याने पक्षाच्याच हाती महापालिकेची सत्ता जाणार असल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. त्यामुळे रंजना भानसी यांच्या महापौर, तर प्रथमेश गिते यांच्या उपमहापौरपदावर फक्त शिक्कामोर्बत होईल. शिवसेना व मनसे तटस्थ राहणार असून, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र उमेदवार दिला आहे. शेवटपर्यंत कॉंग्रेसची निवडणूक लढविण्याची भूमिका कायम असल्याने बिनविरोध निवडीचे भाजपचे प्रयत्न निष्फळ ठरले.

21 फेब्रुवारीला महापालिकेसाठी मतदान झाले. 23 फेब्रुवारीला निकाल आले. त्यात भाजपला मतदारांनी बहुमताच्या पलीकडे म्हणजे 66 नगरसेवक निवडून दिल्याने त्याच पक्षाची महापालिकेत सत्ता निश्‍चित झाली. यंदाचे महापौरपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने सलग पाच वेळा निवडून आलेल्या रंजना भानसी यांचे नाव महापौरपदासाठी निश्‍चित झाले. उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते यांच्या नावाला वरिष्ठ पातळीवरून पसंती दिली. दोन्ही पदांसाठी भानसी व गिते यांचेच अर्ज दाखल झाले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनुक्रमे महापौरपदासाठी आशा तडवी-मानकर, तर उपमहापौरपदासाठी सुषमा पगारे यांचे अर्ज दाखल केले. कॉंग्रेस आघाडीचे निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचे प्रयत्न आहेत.

भाजपकडून विजयोत्सवाची तयारी
महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच महापालिकेत भाजपची बहुमताने सत्ता आल्याने महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर तेवढ्याच जोशात विजयोत्सव साजरा करण्याची तयारी करण्यात आली. सकाळी साडेआठला भाजपचे 66 नगरसेवक, जनसंघ ते आतापर्यंत पक्ष वाढविण्यात सहभागी झालेले कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक आडगाव नाका येथील स्वामिनारायण मंदिर सभागृहात होईल. पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारे, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्यासह आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधतील. तेथून सव्वादहाला महापालिका सभागृहाकडे नगरसेवक बसने प्रयाण करतील. 66 नगरसेवकांना भगवे फेटे बांधले जाणार आहेत.

पावणेबाराला सभागृहात नगरसेवक उपस्थित राहतील. महापौर, उपमहापौरांची निवड झाल्यानंतर महापौरांच्या रामायण बंगल्यानावर नगरसेवक उपस्थित राहतील. तेथून पुढे मिरवणुकीने सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे मिरवणूक जाईल. महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर पुढे सीबीएसमार्गे पक्षाच्या वसंत-स्मृती कार्यालयात विजयोत्सव साजरा होईल. पक्ष कार्यालयात शहरातील साधू-महंतांनाही निमंत्रित केले आहे.

Web Title: city rites in bjp