Dhule News : धुळे शहर CCTVच्या निगराणीखाली; शहरात शंभरावर कॅमेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cctv

Dhule News : धुळे शहर CCTVच्या निगराणीखाली; शहरात शंभरावर कॅमेरे

धुळे : शहरातील नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखणे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणे, वाहतूक नियंत्रण तसेच शहरातील संवेदनशील भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे पोलिस दलास आता सीसीटीव्हीची (CCTV) मदत मिळाली आहे. (city under CCTV surveillance Hundreds of cameras Inauguration by Guardian Minister Mahajan dhule news)

शहरातील सहा पोलिस ठाण्यांअंतर्गत लावण्यात आलेल्या ११६ ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे लोकार्पण रविवारी (ता. ५) ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवककल्याणमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपमहापौर नागसेन बोरसे, उपविभागीय पोलिस अधिकारी एस. हृषीकेश रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

धुळे शहराच्या सुरक्षिततेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये पाच कोटी ३६ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन दोन कोटी ६५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. या निधीतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

सप्टेंबर २०२२ मध्ये फायबर नेटवर्क तयार करून सर्व कॅमेरे नियंत्रण कक्षात कनेक्ट करण्यात आले. या कामाचे लोकार्पण पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते झाले. दरम्यान, पुढील काळात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे या वेळी पालकमंत्री महाजन म्हणाले.

या आर्थिक वर्षात साक्री, शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा या शहरांमध्येही सीसीटीव्ही सनिरीक्षण यंत्रणा बसविण्याचे काम सुरू करण्यात येणार असून, यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास मदत होणार असल्याचे पोलिस अधीक्षक श्री. बारकुंड यांनी या वेळी सांगितले.

कुठे किती कॅमेरे?

धुळे शहर पोलिस ठाणे हद्दीत ३३, आझादनगर- २०, देवपूर- ३१, देवपूर पश्चिम- १४, चाळीसगाव रोड- १०, मोहाडी पोलिस ठाणे हद्दीत आठ असे एकूण ११६ ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.