...तर क्‍लासचालकांचे पाणी, वीज खंडित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

आगप्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या शहरातील क्‍लासचालकांना नोटीस बजावण्यात येऊन आगप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत पाच क्‍लासचालकांनी यंत्रणेच्या परवानगीसाठी अग्निशमन विभागाकडे अर्ज केले आहेत. 
- संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी

जुने नाशिक - सुरत येथील खासगी क्‍लासला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेनंतर शहराच्या अग्निशमन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व क्‍लासचालकांना अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविण्याचे आदेश क्‍लासचालकांना यापूर्वीच दिले आहेत. या नियमाकडे कानाडोळा करणाऱ्या क्‍लासचालकांचा थेट वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिली.

शहरात अनेक खासगी क्‍लासेस सुरू आहेत. त्यातील काही नोंदणीकृत, तर काही अनधिकृत आहेत. क्‍लासचालकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांकडे विशेष लक्ष देणे आवश्‍यक आहे. तसे त्यांच्याकडून केले जात नसल्याचे चित्र दिसून येते. सुरत येथील क्‍लासला लागलेल्या आगीच्या घटनेत अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातील अग्निशमन विभाग यंत्रणाही खडबडून जागी झाली. विभागाकडून शहरातील विविध भागांतील खासगी क्‍लासचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथील अग्निप्रतिबंधक योजनांची पाहणी करण्यात आली. त्यातील बोटावर मोजण्याइतक्‍या क्‍लासेसमध्ये अग्निप्रतिबंधक योजना कार्यान्वित असल्याचे दिसून आले. अग्निशमन विभागाच्या पथकाने अशा क्‍लासचालकांना देखभालीच्या सूचना दिल्या होत्या, तर ज्या क्‍लासेसमध्ये उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशा सुमारे २३९ क्‍लासेसला नोटीस बजावण्यात आली. एक महिन्याची मुदत नोटिशीमध्ये देण्यात आली. या मुदतीत क्‍लासचालकांनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना करत आवश्‍यक ती यंत्रणा बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. एक महिन्यानंतर पुन्हा सर्वच क्‍लासेसचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, आवश्‍यक उपाययोजना न केलेल्या क्‍लासचालकांना शेवटची संधी म्हणून आणखी काही दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर मात्र क्‍लासचालकांनी घटनेचे गांभीर्य ओळखले नाही, तर अशा क्‍लासचालकांवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. बैरागी यांनी सांगितले. अग्निप्रतिबंधक यंत्रणा न बसविणाऱ्या क्‍लासेसचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. जोपर्यंत त्यांच्याकडून आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली जात नाही तोपर्यंत पुरवठा खंडितच ठेवला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. क्‍लासचालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी न खेळता वेळेत उपाययोजना करण्याचे आवाहनही अग्निशमन विभागाकडून करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Class owner water electricity close by fire brigade decision