अभिजात साहित्यातील नायक-नायिका

विजय निपाणेकर
रविवार, 8 जानेवारी 2017

राइनेर मारिया रिल्के आपल्या एका कवितेत म्हणतात, ‘वृक्ष... मी पाहत राहिलो त्याच्याकडे... आणि तो माझ्या आत उगवत राहिला...’ अभिजात साहित्यातील सकस वाचन प्रवासात पाणपोयीसारखे भेटलेले अनेक नायक-नायिका असतात... ज्यांनी आपल्या जगण्यातील भंगाराचेसुद्धा सोने केलेले असते... आपले जगणे समृद्ध केलेले असते... त्या-त्या वेळी आपल्याला आश्‍वासक मदतीचा उबदार हात दिलेला असतो... आपली मने श्रीमंत करून टाकलेली असतात... अशा सकस साहित्यातील विजय निपाणेकर यांनी करून दिलेली विविध हिरोज्‌ची ओळख आपण ‘रविवार विशेष’च्या या लेखमालेतून करून घेणार आहोत.

मानवी संस्कृतीच्या सुदृढ घडणीत पुस्तकांनी मोठा हातभार लावला आहे... दुःखात दिलासा दिला... सुरात सोबत केली... गर्दीत गाणे गायले... एकांतात समजूतदार सहकारी बनले... प्रेमाचा पावसाळा असो, की उपेक्षेचा उन्हाळा... पुस्तकांनी नेहमीच विनातक्रार आपल्याला कुशीत घेतलेले असते... आयुष्याचा अर्थ उलगडून दाखवलेला असतो... आपल्या ‘लिलिपुट’ जगातील ताडमाड ‘गलिव्हर’ असतात पुस्तके...

लहानपणी वाचलेला साने गुरुजींचा मनूबाबा मोठेपणी ‘ला मिझरेबल’चा जीन वाल्जीयन बनून आर्ततेचे आकाश अनुभवाला आणतो... हर्मन मेलव्हिलचा मॉबी डिब वहाब आणि अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन ॲण्ड द सी’मधील म्हातारा सॅंटियागो आपल्याला सांगतात, की अखेर स्वप्नांचा सांगाडाच माणसाच्या हाती लागतो, पण म्हणून लढण्याचे मोल कमी होत नाही... फ्रान्झ काफ्काच्या ‘द कॅसल’मधील के आणि ‘द ट्रायल’मधील जोसेफ के आणि ‘मेटॅमॉरफॅसिस’मधील ग्रेगोर साम्सा आपल्याला जळालेल्या स्वप्नांच्या प्रदेशातील भयाण भयाच्या भयानक भुयारात घेऊन जातात... मुक्तिबोधांचा विशू आणि प्रकाश नारायण संतांचा लंपन बालपणाच्या बिलोरी बोलातून निखळ निरागस नक्षी दाखवतो... सॅलिंजरच्या ‘कॅचर इन द राय’मधील होल्डन कॉलफिल्ड आणि भालचंद्र नेमाडेंचा पांडुरंग सांगवीकर... चांगदेव पाटील आणि खंडेराव म्हणजे उदाहरणार्थ आपलाच अवतार धारण करून येतात... तर मनोहर शहाणेंच्या ‘पुत्र’मधील अच्युत अलिप्तपणे आपल्या अस्तित्वाच्या आदिम आउटसायडर मुळाकडे घेऊन जातो... अल्बेयर कामूचा आउटसायडर मेरसॉल आणि सिसिफस एक शांत बंड साकार करतो... दस्तयेवस्कीचा आल्योषा... ऑस्कर वाइल्डचा डोरियन ग्रे... खानोलकरांची रात्र काळी-लक्ष्मी... विश्राम बेडेकरांची रणांगण हॅर्टा.. मर्ढेकरांचा रात्रीचा दिवस-दिक्‌पाल... ॲन रॅण्डचा हॉवर्ड होआर्क... मंटोचा टोबा टेकसिंह... आल्डस हक्‍सलेचा जॉन... जॉर्ज ऑरवेलचा विंटसन स्मिथ... कॅच २२ चा युसेरिन... केविन वारविकचा सायबोर्ग... नीत्सेचा सुपरमॅन झटथुष्ट्रा... अरविंद घोषांची सावित्री... सरवांटिसचा डॉन क्‍विझॉट... काझानजाकिसचा झोर्बा... जी.एं.चा प्रवासी... भाऊ पाध्येंचा अनिरुद्ध धोपेश्‍वरकर... विजय तेंडुलकरांची लीला बेणारे... डॅन ब्राउनचा लॅंगडन... जे. के. रोलिंगचा हॅरी पॉटर... भीष्म साहनींचा हानुश.. अमृता प्रीतमचा संजय... किती किती दीपस्तंभ... किती किती दीपमाळा... आपल्या अंतरीचा गाभारा उजळून टाकण्यासाठी!

आज जीवन झपाट्याने बदलत चालले आहे... कालचे पाणी आज नाही... आजचे उद्या नाही... चेहरा नसलेल्या भयानक मुखवट्याच्या गर्दीत इतरांच्या आधारावर आपले अस्तित्व असते... गर्दीपासून विलग झाल्यावर एकटे असताना आपण कुणाचा आधार शोधणार? समूहात सामील व्हावे तर कुणाचे तरी वर्चस्व सोसावे लागेल आणि एकटे असलो तर ‘स्व’च्या शोधात स्वतःला सोसून काढण्याची हिंमत नाही, अशा दुविधेत आपण असताना आपल्याला आधार देणाऱ्या या सकस साहित्यातील हिरोज्‌च्या सावलीत सुख शोधू या...

दुसरोंसे बहुत आसान है मिलना साकी ।
अपनी हस्तीसे मुलाकात बडी मुश्‍किल है ।।

Web Title: Classical literary hero-heroine