शास्त्रीय संगीत मनाची एकाग्रता वाढवते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

जळगाव - प्राचीन संस्कृतीपासून धृपद संगीताला मोठा इतिहास आहे. सध्या कर्कश आवाज व बेसूर असे पाश्‍चिमात्य धर्तीवरील संगीत प्रचलित केले जात आहे, ते नीरस असल्याने मनाला आनंद देत नाही. परंतु शास्त्रीय संगीत मनाची एकाग्रता वाढविते, स्फूर्तिदायक बनवून चैतन्य निर्माण करते, असे परखड मत भोपाळ येथील धृपद गायक पंडित रमाकांत व उमाकांत गुंदेचा यांनी व्यक्त केले. 

बालगंधर्व संगीत महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी धृपद गायनातील घराण्यांची माहिती देऊन त्यांनी हे संगीत प्राचीन असल्याची माहिती दिली. तसेच धृपद संगीत पुढे अशाच पद्धतीने सुरू राहावे, यासाठी देशभरात विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी कार्यशाळा, क्‍लासेस घेऊन ही कला शिकवत आहोत, असे ते म्हणाले. आजपर्यंत ३० देशांमध्ये ही कला सादर केल्याचे सांगतांना त्यांनी अमेरिका तसेच युरोपीय देशातून अनेक तरुण कला शिकण्यासाठी दरवर्षी येत असल्याची माहितीही दिली. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाचा मानसिक तणाव वाढत असतो. यावर सर्वांत चांगला उपाय म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी ते सर्वोत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले. आजची तरुणाईही रॉक म्युझिकसोबत भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते, ही चांगली बाब असल्याचे ते म्हणाले.

वादनकलेत मुलीही अग्रेसर
मुंबईतील बासरी वादक देबोप्रिया व सुचिता-स्मिता या भगिनींनी दिलखुलास गप्पा मारताना लहानपणापासून गाणे, नृत्य, बासरी वादनाची गोडी वडिलांनी लावल्याचे सांगितले. यामुळे बासरीकडे कल वाढत जाऊन ही कला आपण आत्मसात केल्याचे त्या म्हणाल्या. बासरी वाद्य हे नैसर्गिक असल्याने इलेक्‍ट्रॉनिक वाद्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे. कलाक्षेत्रात मुलीही पुढे येत आहेत व कला आत्मसात करण्यासाठी सर्व स्तरातून ओढा वाढलेला दिसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Classical music increases the concentration of mind