सफाई कर्मचाऱ्यांचा धुळ्यात सन्मान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

धुळे - ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या महापालिकेच्या २० महिला- पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता. ६) महापालिकेत पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट स्वच्छतामित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

धुळे - ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या महापालिकेच्या २० महिला- पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता. ६) महापालिकेत पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट स्वच्छतामित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छतेच्या कामात शहराला चांगले मानांकन मिळावे, यासाठी महापालिकेत प्रयत्न होत आहेत. यात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. या उपक्रमांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या दहा पुरुष व दहा महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा काल सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते सन्मान झाला. स्थायी समिती सभापती युवराज पाटील, उपायुक्त गणेश गिरी, नगरसेवक नागसेन बोरसे, राजेश पाटील, मीनाक्षी बोरसे, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, प्रभारी सहाय्यक आयुक्त विजय सनेर, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. 

स्वच्छता उपक्रमांमध्ये उपस्थिती, कार्यतत्परता, कामाची आवड आदी निकषांवर कर्मचाऱ्यांची सत्कारासाठी निवड झाली. या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. आयुक्त शेख, श्री. गोसावी, श्री. सनेर यांनी सन्मानार्थींचे कौतुक केले. दरम्यान, अशा प्रकारचे कार्यक्रम दरमहा घेण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्यांची स्वच्छतामित्र पुरस्कारासाठी राज्यस्तरावर निवड होणार आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील व इतर स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. अनिल साळुंके, नगरसचिव मनोज वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

टिफीन बॉक्‍स भेट
सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बोरसे यांच्या स्मृतीनिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना टिफीन बॉक्‍स भेट देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaning workers honored in dhule