दत्तक नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा वचक संपला?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नाशिक - महापालिकेत भाजपची सत्ता, चार आमदार, दोन खासदार व जिल्हा परिषद, नगरपालिकांत बहुसंख्य भाजपचे सदस्य असताना पक्षाची ताकद वाढल्याचे दिसत आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्ताने मात्र भाजपची ताकद फक्त कागदावर दिसून येत असून, प्रत्यक्षात मतदानाच्या रूपाने दिसत नाही. एका-एका जागेसाठी मुख्यमंत्री जंगजंग पछाडत असताना, दत्तक नाशिकमध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडूनच धोबीपछाड मिळत असल्याचे दिसून येते.

गेल्या चार वर्षांत लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भाजपची विजयी घोडदौड सुरू असल्याने पक्षाची ताकद निश्‍चितच वाढली आहे. त्यामुळे भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष उभारत असताना, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व सध्या शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करताना खुद्द मुख्यमंत्र्यांचे आदेश पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनीच डावलल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांत नेते, नगरसेवक मुख्यमंत्र्यांचे ऐकत नसतील, तर भाजप पार्टी विथ डिफरन्स कशी, असा सवाल केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड. शिवाजी सहाणे यांना पाठिंबा दिला होता. एक दिवसाच्या सहलीवर जाताना मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भ्रमणध्वनीवरून प्रत्येक नगरसेवकाशी संवाद साधत ॲड. सहाणे यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ॲड. सहाणे यांना राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे व भाजपचे मिळून साडेतीनशेपेक्षा अधिक मते पडणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात सहाणे यांच्या विरोधातील नरेंद्र दराडे यांना ३९९ मते पडली. मते कुठल्या पक्षाची फुटली हे जाहीर नसले, तरी भाजपची सर्वाधिक मते फुटल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. याचाच अर्थ भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलत पहिला झटका दिला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे कवित्व संपत नाही, तोच पुन्हा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागली. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी बंडखोरी केली. 

अर्ज माघारीच्या दिवशी श्री. सोनवणे यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी परदेशातून संपर्क साधला. अखेरच्या क्षणी सोनवणे यांनी ‘यू टर्न’ घेतल्याने मुख्यमंत्र्यांचा दुसरा आदेश डावलल्याने मुख्यमंत्र्यांचा नाशिकमधील वचक संपल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भविष्यातील धोक्‍याची घंटा
पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलले जात असल्याने भविष्यात पक्षाची राजकीय वाटचाल बिकट असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलले जात असतील, तर स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोण जुमानणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: CM Devendra Fadnavis not political hold in Nashik