वाढत्या तापमानामुळे अतिसार, सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

डॉक्‍टरांनी सुचविलेले उपाय 
- शक्‍य असल्यास उन्हात फिरणे टाळावे. 
- उन्हात जाताना उन्हापासून संरक्षण करणाऱ्या वस्तूंचा वापर करावा 
- जास्त पाणी प्यावे 
- पाणीयुक्त फळांचे सेवन करावे 
- ताक, दही, लिंबू-पाणी, ग्लुकोजसारख्या थंड पेयांचे सेवन करावे 

जुने नाशिक - शहराच्या तापमानात वाढ झाल्याने ताप, अतिसार, सर्दी, खोकल्यासारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. शहरातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी होत आहे. 

सध्या शहरात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. बऱ्याच नागरिकांना दैनदिन कामांसाठी घराबाहेर पडावे लागते. उन्हाचे चटके सहन करावे लागत असल्याने त्यांना अतिसार, ताप, सर्दी-खोकला यांसारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. जुने नाशिक, वडाळा, भारतनगरसह येथील विविध ठिकाणी अशा आजाराने पीडित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसते. त्यांच्याकडून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात गर्दी होत आहे. इतर वेळी रोज शंभर ते दीडशे रुग्णांची तपासणी डॉक्‍टारांकडून केली जाते. मात्र, तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यानुसार रोज तीनशे ते साडेतीनशे रुग्णांची तपासणी होते. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्दी-खोकला, तापासह अतिसार व उलट्या होण्याचे प्रमाण अधिक आहे. हेच रुग्ण वाढत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दरम्यान, उन्हामुळे चक्कर येऊन पडणे, असे रुग्णही उपचारास येत आहेत. 

डॉक्‍टरांनी सुचविलेले उपाय 
- शक्‍य असल्यास उन्हात फिरणे टाळावे. 
- उन्हात जाताना उन्हापासून संरक्षण करणाऱ्या वस्तूंचा वापर करावा 
- जास्त पाणी प्यावे 
- पाणीयुक्त फळांचे सेवन करावे 
- ताक, दही, लिंबू-पाणी, ग्लुकोजसारख्या थंड पेयांचे सेवन करावे 

दिवसा कडक ऊन व सायंकाळी गारवा यामुळे मानवी शरीर कुठल्याही एका वातावरणाशी समरस होत नसल्याने रोगप्रतिबंधक शक्ती कमी होत आहे. सर्दी-खोकला व तापासारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. नागरिकांनी शरीराची योग्य काळजी घेत वेळेवर योग्य तो आहार घेतला पाहिजे. 
डॉ. संजय भंडारी (डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, वैद्यकीय प्रमुख) 

Web Title: Cold, cough citizens agitate