थंडीचा कडाका वाढला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

जळगाव - जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा सरासरी पारा 10 अंशांवर स्थिरावला आहे. गार वाऱ्यांमुळे जळगावकर गारठले आहेत. वाढलेल्या थंडीमुळे गहू, हरभरा या रब्बीच्या पिकांना फायदा होत आहे. सकाळपासूनच वातावरणात असलेला गारठा अन्‌ दिवसभर गार वाऱ्यांची झुळूक यामुळे सायंकाळची थंडीने बोचरे रूप धारण केल्याचे जाणवायला लागले आहे. 

जळगाव - जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा सरासरी पारा 10 अंशांवर स्थिरावला आहे. गार वाऱ्यांमुळे जळगावकर गारठले आहेत. वाढलेल्या थंडीमुळे गहू, हरभरा या रब्बीच्या पिकांना फायदा होत आहे. सकाळपासूनच वातावरणात असलेला गारठा अन्‌ दिवसभर गार वाऱ्यांची झुळूक यामुळे सायंकाळची थंडीने बोचरे रूप धारण केल्याचे जाणवायला लागले आहे. 

हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात बऱ्याचदा चढउतार झाला. नोव्हेंबरच्या मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी गायब झाली होती. यामुळे तापमान 15-16 अंश सेल्सिअस नोंदविले जात होते. परिणामी फारशी थंडी जाणवत नव्हती. परंतु, या महिन्याच्या सुरवातीपासून तापमान खाली येत गेल्याने थंडीत वाढ झाली. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून गारठ्यात अधिक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील तापमान गेल्या तीन दिवसांपासून 10 अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे. यासोबतच थंड वाऱ्याची झुळूक येत असल्याने गारवा अधिक जाणवू लागला आहे. 

उबदार कपड्यांना मागणी 
या आठवड्यात थंडीचा जोर वाढू लागल्याने उबदार कपड्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे. दिवसभर थंडी जाणवत असून, दिवसभर अंगात स्वेटर घातले जात आहे. वाढलेल्या थंडीमुळे शिवतीर्थ मैदानाजवळील विक्रेत्यांकडे तसेच आयटीआय परिसरात विक्रेत्यांकडून उबदार कपडे खरेदीसाठी दिवसभर गर्दी दिसत आहे. कानटोपी, स्वेटर, जॅकेट, हातमोजे यांची मागणी अधिक वाढली आहे. 

हरभरा, गहूला फायदा; केळीवर दुष्परिणाम 
तापमानाने नीचांक गाठला असल्याने बाल्यावस्थेत असलेल्या रब्बी पिकांना या थंडीचा मोठा फायदा होईल. यात प्रामुख्याने गहू, हरभरा आणि दादर या पिकांची वाढ जोमाने होण्यास मदत होईल. सुरवातीपासूनची थंडी या पिकांना पोषक ठरून थंडीचे प्रमाण कायम राहिल्यास उत्पादनात वाढीची आशा आहे. परंतु ही थंडी अधिक कमी झाल्यास त्याचा फायदा पिकांना होणार आहे. मात्र, सद्यःस्थितीत असलेले 10 अंश तापमान रब्बी पिकांसाठी फायद्याचे आहे. मात्र 10 अंशांखाली असलेले तापमान केळीवर दुष्परिणाम करणारे आहे. कारण या स्थितीत जमिनीतून खत व आवश्‍यक अन्नद्रव, पाणी शोषून घेण्यास अडचणीचे होते. परिणामी, पाने पिवळसर पडून चरका वाढीची शक्‍यता आहे. शिवाय झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनातही घट येते. 

मागील पाच दिवसांचे तापमान 
दिनांक............किमान तापमान 
10 डिसेंबर........13 अंश 
11 डिसेंबर........12 अंश 
12 डिसेंबर........12 अंश 
13 डिसेंबर........10 अंश 
14 डिसेंबर........10 अंश 
15 डिसेंबर........10 अंश 

Web Title: Coldness increased in jalgaon