सामूहिक प्रयत्नांनी बालमृत्युदरात निम्म्याने घट

नरेंद्र जोशी
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

असे झाले प्रयत्न...

  • बालमृत्यू व कुपोषण कमी करण्याकरिता पाठपुरावा. 
  • संदर्भसेवा, उपचार, अति जोखमीच्या मातांची सरकारी रुग्णालयातच प्रसूतीबाबत नियोजन
  • शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करून मध्यम व तीव्र कुपोषित बालकांचा शोध
  • नवीन जन्म झालेल्या बालकांचा आशा, आरोग्यसेविकांमार्फत रोज पाठपुरावा
  • गंभीर आजारी बालकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार
  • अति जोखमीच्या मातांची जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात प्रसूती

नाशिक - कोचरगाव (ता. दिंडोरी) प्राथमिक आरोग्य केंद्राने दोन वर्षांत बालमृत्यू कमी करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना यंदा यश आले आहे. २५ ते ३० पर्यंत गेलेला बालमृत्युदर आता दहावर आला आहे. आरोग्य व शिक्षणाला पंचायत समितीने दिलेल्या प्राधान्यामुळे हे आशादायक चित्र साध्य झाले आहे.  

कोचरगाव दहा हजार लोकवस्तीचे गाव. आजूबाजूची खेडीपाडी या गावाला जोडली गेली आहेत. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला २१ हजार नागरिकांच्या आरोग्याची काळजी असते. या परिसरात पूर्वीपासून बालमृत्युदर जास्तच होता. त्याला बरीच कारणे होती. त्यामुळे उघड्या डोळ्याने बालमृत्यूचे थैमान पाहावे लागत होते. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रामा खोकले व डॉ. पंकज जाधव यांनी हे चित्र बदलण्याचा निर्धार केला. जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे, पंचायत समिती सदस्य वसंत थेटे यांची खंबीर साथ, तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.    

बालमृत्यूला कारणीभूत नेमकी कारणे शोधली. आशा कर्मचाऱ्यांची मदत घेतली. तेव्हा अंधश्रद्धेचा पगडा व दिलेली औषधे नियमित न घेणे व वाढता ॲनिमिया हेच बालमृत्यूला कारणीभूत असल्याचे आढळले. त्यानंतर या प्रश्‍नावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आज हा मृत्युदर दहावर आला आहे.

बालकांचे शंभर टक्के लसीकरण करून घेतले. त्यामुळे आजारी बालकांचे प्रमाण कमी झाले. परिणामी कुपोषण कमी झाले.चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केल्यामुळे प्रोत्साहन मिळून कर्मचारी चांगले कामाला लागले. आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांची आठवड्याला बैठक घेतली. सार्वत्रिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले.  
- डॉ. पंकज जाधव, माजी वैद्यकीय अधिकारी,  प्रा. आ.केंद्र, कोचरगाव

आरोग्य व शिक्षण या विषयांना आम्ही प्राधान्य दिले. बालमृत्यू व कुपोषणमुक्त परिसर व्हावा हा ध्यास घेतला. त्याचे फळ या पद्धतीने मिळाले आहे.
- वसंत थेटे, सदस्य, पंचायत समिती, दिंडोरी

गेल्या २ वर्षांत येथील वैद्यकीय अधिकारी जातीने लक्ष घालत आहेत. त्यामुळे सर्वांनाचांगले उपचार मिळत आहेत. नागरिकांना निरोगी आरोग्यासाठी डॉक्‍टरांच्या प्रयत्नांना आम्हा ग्रामस्थांची पूर्ण साथ आहे. 
- अशोक लिलके, कोचरगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collective efforts reduce child mortality by half