गल्लोगल्ली ज्ञानमंदिरे; गुरू शिष्याच्या शोधात!

संतोष विंचू
सोमवार, 8 जुलै 2019

शिक्षण क्षेत्राविषयी शासनाने सकारात्मक होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी धोरण बदलण्याची गरज आहे. पुढच्या काळातला अंधार दूर करण्यासाठी आणि पायाच भुसभुशीत राहत असल्याने भविष्यातील डोलारा कोसळणार, यासाठी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. विनाअनुदानित, स्वयंअर्थसहित अशा गुळगुळीत शब्दांच्या नावाखाली शाळा-महाविद्यालयांना सहजगत्या परवानगी मिळते. हे धोरण बदलून अनुदानित शाळा-महाविद्यालय चालविली अन्‌ शासनानेही शिक्षणावरील खर्च वाढवला, तर नक्कीच दर्जा व गुणवत्ता यांच्यात वाढ होईल.
- हरीश आडके, शिक्षण अभ्यासक, नाशिक

येवला - शासनाने खिरापतीसारखी विविध शाळा, महाविद्यालयांना मान्यता दिल्याने प्रवेश क्षमता व विद्यार्थी संख्या याचा समतोल बिघडून प्रवेशाचा प्रश्‍न जिल्ह्यात गंभीर होताना दिसतोय. इंग्लिश मीडियम स्कूल गल्लीबोळात, तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये गावोगावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम, उच्चशिक्षणाची सुविधा तालुकास्तरावर उपलब्ध केल्याने विद्यार्थ्यांचा तुटवडा निर्माण होऊन शिक्षकांनाच आता ‘विद्यार्थी देता का विद्यार्थी’, असे म्हणत घरोघरी फिरण्याची वेळ आली आहे. यामुळे यंदा अभियांत्रिकीसह तंत्रनिकेतन, डी. फार्मसी, कनिष्ठ महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, डी. एड., कृषी पदविका तसेच कला व वाणिज्य शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी एक-एक विद्यार्थी शोधावा लागत असल्याने या डझनभर अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहणार आहेत.

कुणीही यावे आणि शाळा-महाविद्यालय घेऊन जावे असे खुले धोरण शासनाने सुरू केल्याने भांडवलदार आणि राजकीय नेते कर्मवीर आणि शिक्षणसम्राट होऊ लागले आहेत. ज्ञानदानाचा पवित्र हेतू बाजूला सारत शिक्षण क्षेत्राचे व्यावसायिकरण झाल्याने उदंड शिक्षण संस्था निर्माण झाल्याची अवस्था जिल्ह्याची झाली आहेत. चार-पाच वर्षांत अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनचे बारा वाजले असून, काहींनी तर महाविद्यालय व शाखांचे शटरडाउन केले आहे. या वर्षी तंत्रनिकेतनच्या निम्म्या जागा तरी भरतील; पण अभियांत्रिकीची मात्र वाट अजूनच बिकट होत असल्याचे चित्र आहे.

डोनेशनसाठी रांगा लागणाऱ्या डी. फार्मसीची दोन वर्षांत नव्याने महाविद्यालये सुरू झाल्याने यंदा विद्यापीठ शुल्कात प्रवेश देण्याची आणि प्रवेशासाठी विद्यार्थी शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. डी.एड., तर कोमातच आहे. मात्र इंग्लिश मीडियमचे पेव फुटल्याने अनेक बेरोजगार युवकांना लागलीच नोकरी मिळते म्हणून बी.एड.चे दोन वर्षांपासून जरा बरे असून, यंदाही बी.एड. फुल होतील, असे आकडे सांगतात. बीबीए, बीसीएस, कृषी पदविका यांसारख्या अभ्यासक्रमांसाठीही विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे.

इंग्लिश मीडियम, तर गावोगावी...
गावोगावी नव्हे, तर गल्लोगल्ली इंग्लिश मीडियम स्कूल सुरू झाल्याने या स्पर्धेत विद्यार्थी शोधूनही मिळेनाशी अवस्था जिल्ह्यात इंग्लिश मीडियमची झाली आहे. अगदी दहा आणि वीस विद्यार्थी संख्येवर वर्ग चालत असल्याचे अनेक इंग्लिश मीडियम शाळांतील चित्र आहे. त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील व गुणवत्ता टिकवणाऱ्या शाळांचे जरा बरे आहे. सोबतच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या इंग्लिश मीडियमलाही पसंती असून, प्रवेशाला लाखो रुपये मोजावे लागत असल्याचेही चित्र आहे.

आता कनिष्ठ महाविद्यालयाची झाली शाळा...
दोन वर्षांत इंग्लिश मीडियम व माध्यमिक शाळा चालविणाऱ्या संस्थांनी कनिष्ठ महाविद्यालय अर्थात, अकरावी, बारावीचे वर्ग स्वयंअर्थसाहितची मान्यता घेऊन सुरू केल्याने गावोगावी कनिष्ठ महाविद्यालयांचेही पेव फुटले आहे. त्यामुळे या वर्षी ग्रामीण भागात नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांनाही विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. एक वेळ काहींचे विज्ञान शाखेचे प्रवेश फुल होतीलही. पण वाणिज्य व कला शाखेसाठी मात्र काहींना तुकड्या गमावण्याचीही वेळ येऊ शकते, असे चित्र आहे. बी.ए., बी.एसस्सी व बी.कॉम. पदवीच्या ज्यांनी गर्दीच्या काळात प्रवेश क्षमता वाढवल्या, त्यांचाही यंदा मंदीचा काळ आहे. विशेषतः कला आणि वाणिज्य शाखांचे प्रवेश अपूर्ण राहतील, अशी अवस्था तालुकास्तरावर अनेक वरिष्ठ महाविद्यालयांची झाली आहे. याशिवाय गेल्या वर्षी बीएचएमएसच्या काही जागा रिकाम्या राहिल्या होत्या, असे चित्र यंदाही राहण्याचा अंदाज आहे.

यांची आहे चलती..
सर्वाधिक क्रीम अभ्यासक्रम म्हणून एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस आणि कृषी महाविद्यालयांकडे पाहिले जात असल्याने यासाठीचे मेरिट व डोनेशनही कल्पनेपलीकडचे आहे. याशिवाय दहावीनंतर दोन वर्षांचा कोर्स केला, की नोकरीची बऱ्यापैकी हमी असल्याने अनेक विद्यार्थी व पालकांचा ओढा आयटीआयकडे वाढत असल्याने जिल्ह्यातील खासगी व शासकीय आयटीआयमधील साडेसहा हजार जागा चुटकीसरशी भरून जातात. किंबहुना खासगी आयटीआयमध्ये तर डोनेशनही आकारले जाते.

नर्सिंग क्षेत्रात उपलब्ध सरकारी व खासगी क्षेत्रांतील नोकरीच्या संधीमुळे हा अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहे. तर एमबीएची स्थिती गेल्या वर्षीपासून सुधारली असून, उपलब्ध जागा भरल्या जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College Student Teacher Education