बालहक्क आयोगाची राहुल गांधींना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

जळगाव - जामनेर तालुक्‍यातील वाकडी येथील अल्पवयीन मुलांना नग्न करून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ "ट्विटर हॅन्डल'वर शेअर करून तो व्हायरल केल्याप्रकरणी बालहक्क आयोगाने कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. दहा दिवसांत याप्रकरणी खुलासा मागविण्यात आला असून, त्यानंतर आवश्‍यक वाटल्यास आयोग याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची शिफारस करणार आहे.

जामनेर तालुक्‍यातील वाकडी येथे विहिरीत पोहण्याच्या कारणावरून दोन-तीन अल्पवयीन मुलांना शेतमालकाने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात रविवारी (ता.10) घडला होता. या घटनेचा व्हिडिओ करून शेतमालकानेच तो व्हॉट्‌सऍपवर व्हायरल केल्यानंतर 14 जूनला हे प्रकरण समोर आले. त्यानंतर या घटनेला जातीय रंग चढला आणि वाकडीला भेट देण्यासाठी प्रदेश स्तरावरील नेते, मंत्री, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष आदींची रीघ लागली.

राहुल गांधींचे ट्‌वीट गोत्यात
दरम्यान, या घटनेवरून राहुल गांधी यांनी 14 जून रोजी ट्विट करत घटनेचा निषेध केला, तसेच मोदी सरकारच्या काळात दलित समाजावरील अन्याय वाढल्याचा संदेश देत या पीडित मुलांचा व्हिडिओही त्यांच्या "ट्विटर हॅन्डल'वरून शेअर केला होता. त्यांचे हे ट्विट आता गोत्यात आले आहे.

अर्जाची दखल घेत नोटीस
याप्रकरणी मुंबईतील रहिवासी अमोल जाधव यांनी बालहक्क आयोगाकडे अशाप्रकारे पीडित अल्पवयीन मुलांच्या बदनामीचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी राहुल गांधींवर कारवाई करण्याची मागणी करणारा अर्ज सादर केला आहे. या अर्जाची दखल घेत बालहक्क आयोगाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे.

बालन्याय कायदा व बाललैंगिक शोषण कायद्यातील तरतुदीनुसार राहुल गांधी यांनी ट्विटवर शेअर केलेल्या छायाचित्राचा प्रकार गंभीर आहे, त्यासंबंधी त्यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन आवश्‍यक वाटल्यास गुन्हा दाखल करण्यासंबंधी शिफारस करण्यात येईल.
- प्रवीण घुगे, अध्यक्ष, बालहक्क आयोग (महाराष्ट्र राज्य)

Web Title: Commission of Inquiry Notice to Rahul Gandhi