आयुक्तांच्या प्रतिप्रश्‍नांनी तक्रारदारच निरुत्तर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

नाशिक - ‘कारवाई’प्रिय आयुक्त अशी प्रतिमा नाशिककरांमध्ये निर्माण केलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (ता. २८) सामान्यांच्या तक्रारी, प्रश्‍नांची सोडवणूक करताना त्यातील कायदेशीर अडचणी, क्‍लिष्टता मांडल्याने बोटावर मोजण्याइतके प्रश्‍न वगळता इतर ‘जैसे थे’ राहिले. उलट प्रत्येक तक्रारीवर प्रतिप्रश्‍न ऐकायला मिळाल्याने तक्रारदारच निरुत्तर झाले. खासदार, आमदार, नगरसेवकांच्या प्रश्‍नांत कायदेशीर आडकाठी निर्माण करणाऱ्या आयुक्तांनी तक्रारदारांनाही न सोडल्याने त्यांचीही गोची झाली.

नाशिक - ‘कारवाई’प्रिय आयुक्त अशी प्रतिमा नाशिककरांमध्ये निर्माण केलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (ता. २८) सामान्यांच्या तक्रारी, प्रश्‍नांची सोडवणूक करताना त्यातील कायदेशीर अडचणी, क्‍लिष्टता मांडल्याने बोटावर मोजण्याइतके प्रश्‍न वगळता इतर ‘जैसे थे’ राहिले. उलट प्रत्येक तक्रारीवर प्रतिप्रश्‍न ऐकायला मिळाल्याने तक्रारदारच निरुत्तर झाले. खासदार, आमदार, नगरसेवकांच्या प्रश्‍नांत कायदेशीर आडकाठी निर्माण करणाऱ्या आयुक्तांनी तक्रारदारांनाही न सोडल्याने त्यांचीही गोची झाली.

‘अनेकांनी हात दाखवून अवलक्षण नको,’ असे ठरवत आयुक्तांच्या पहिल्या कार्यक्रमात ‘हेही चांगले आणि तेही चांगले’ ऐकण्यातच धन्यता मानली.
नवी मुंबईच्या धर्तीवर आयुक्त मुंढे यांनी नाशिकमध्ये हा उपक्रम सुरू केला.

गेल्या शनिवारी (ता. २१) मातोश्रींच्या आजारपणामुळे श्री. मुंढे गोल्फ क्‍लबवर आले. नाशिककरांना भेटून आजच्या (ता. २८) शनिवारचे आश्‍वासन देत निघून गेले. याच आठवड्यात त्यांच्या रजेचीही चर्चा सुरू झाल्याने मुंढे आश्‍वासन पाळतात की नाही, याबद्दलही साशंकता निर्माण झाली. ते नाशिककरांच्या भेटीला सकाळी साडेसहालाच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आले आणि उपक्रमाचा धडाकेबाज प्रारंभ केला. तब्बल अडीच तास रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक, ड्रेनेज, अतिक्रमण यांसारख्या तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या. गेल्या आठवड्यात ७१ तक्रारी प्राप्त होत्या. त्यापासून पुढे ७२ व्या तक्रारीच्या टोकनपासून ९७ पर्यंत लेखी तक्रारींचा त्यात समावेश होता.

प्रत्येक प्रश्‍नात सल्ला, कारवाईची तंबी   
एखाद्या तक्रारीकडे बोट दाखविताना चार बोटे आपल्याकडेही असतात. त्यामुळे तक्रार करताना तक्रारदाराने स्वतःही नियमांचे पालन केले पाहिजे, असा संदेश सुरवातीला त्यांनी ऐकवला. पहिली तक्रार नगररचना विभागाशी संबंधित होती. अधिकाऱ्यांकडूनच धमकावले जात असल्याचे तक्रारदाराने सांगितले. पण तक्रारदाराने एफएसआयपेक्षा अधिक बांधकाम केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या तक्रारदारालाच तंबी दिली. दुसऱ्या एका तक्रारीत सहा महिने रखडलेले काम ७२ तासांत पूर्ण झाल्याचे सांगत तक्रारदाराने समाधान व्यक्त केले. पण त्याच वेळी तक्रारीबरोबरच शोभेची झाडेही लावण्याचा सल्ला देत आयुक्त मोकळे झाले.

स्वखर्चाने कामे करण्याचा सल्ला
सराफ बाजारात दुकानासमोरील वाहनांच्या पार्किंगचा मुद्दा एकाने उपस्थित केला. त्यावर दुकानदाराने पार्किंगची व्यवस्था केली का, या प्रश्‍नावर तक्रारदार निरुत्तर झाले. ग्रीन जिम नादुरुस्तीच्या तक्रारीवर नागरिकांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. 

तिडके कॉलनीतील स्नेहवर्धन सोसायटीत पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी शिरल्याची तक्रार तत्काळ सोडविण्याच्या सूचना देताना इमारतीला नियमानुसार दोन गेट आहेत का, असा सवाल करून आयुक्तांनी नियमाकडे लक्ष वेधले. सहा महिन्यांपासून रखडलेली वृक्षतोडीची परवानगी, के. के. वाघ महाविद्यालयाजवळील सरस्वतीनगर येथे रस्त्यात येणारे मंदिर आदी तक्रारींचे न्यायालयाच्या सूचनेनुसार निवारण करण्याचे आश्‍वासन दिले.

‘हेही चांगले, तेही चांगलेच’
तक्रार ऐकताना आयुक्तांनी झाडे लावा, पार्किंगची सोय करा, शेजारच्याचे अतिक्रमण पाडा, जिमची दुरुस्ती स्वतः करा, विक्रेत्यांना स्वतःहून उठवून द्या, असा सूचनावजा सल्ला देत प्रशासन सध्या करीत असलेल्या व भविष्यातील चांगल्या कामांची जंत्रीच मांडली.

इमारतीवरच कारवाईचा आदेश अन्‌ गोची
टाकळी रोडवरील रामदास स्वामीनगरच्या भीमस्तंभ येथील एका इमारतीत अनधिकृत पार्किंगची तक्रार करण्यात आली. इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला का, या प्रश्‍नावर निरुत्तर झालेल्या तक्रारदाराला इमारत अनधिकृत असेल तर ती पाडण्याची कारवाई होईल, असे सुनावले. त्यामुळे तक्रारदाराची नाराजी ओढावली. सातपूरच्या महाराष्ट्र हौसिंग सोसायटीत अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीवर अनधिकृत असेल, तर संपूर्ण बांधकामच तोडण्याचे आदेश जागेवर देत तक्रारदाराची गोची करून टाकली.

...आणि आमदार, नगरसेवकांनाही दणका
डिसूझा कॉलनीच्या टेनिस कोर्टलगतच्या रस्त्यावर महापालिकेने हॉकर्स झोन निश्‍चित केला आहे. तेथे बसू दिले जात नसल्याच्या तक्रारीवर विभागीय अधिकारी नितीन नेर यांना विचारणा केली. त्या वेळी सदस्यांचा विरोध असल्याची माहिती मिळाली. त्यावर सदस्यांच्या मालकीची प्रॉपर्टी आहे का, असा सवाल करत आयुक्तांनी नगरसेवक व या भागात राहणाऱ्या तिन्ही आमदारांना आव्हान दिले.

Web Title: Commissioner Antagonism Complainant