नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त होण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करावेत : डॉ.नरेश गीते

gite
gite

सटाणा - नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असून प्रथम कुपोषणाबाबत खरी माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांनी पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून वंचित बालकांचा शोध घ्यावा व त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी काल शुक्रवार (ता.८) रोजी येथे केले.

येथील नंदनवन लॉन्स येथे आयोजित बागलाण व देवळा तालुक्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या एकत्रित आढावा बैठकीत डॉ. गिते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रदीप पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी दत्तात्रय मुंडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी ईशादिन शेलकंदे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, गटविकास अधिकारी महेश पाटील व सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कोर आदि उपस्थित होते.
डॉ. गिते म्हणाले, कुपोषण निर्मुलनासाठी जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले असून त्यामधून कुपोषित बालकांना आहार व औषधे देण्यात येत आहेत. मात्र बागलाण व देवळा तालुक्यात सर्वेक्षणातून प्राप्त माहितीवर मी समाधानी नसून दोन्ही तालुक्यांनी येत्या आठ दिवसात पुन्हा सर्वेक्षण करून वंचित राहिलेल्या बालकांना शोधून त्यांना ग्राम बालविकास केंद्रात भरती करा. सर्वेक्षणात राहून गेलेल्या बालकांना उपचारापासून वंचित ठेवणे हे महापाप आहे. यासाठी आरोग्य, महिला व बालकल्याण व ग्रामपंचायत विभागांनी समन्वयाने येत्या आठ दिवसात नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश डॉ. गिते यांनी दिले. 

यावेळी डॉ. गिते यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी ग्रामबाल विकास केंद्राबाबत आढावा घेतला. तसेच ग्रामसेवकांनी ग्राम विकास आराखड्यातील १० टक्के रक्कम अंगणवाडीच्या खात्यात वर्ग केली किवा नाही याबाबत आढावा घेतला. डांगसौंदाणे येथील ग्रामसेवकाने कुपोषणासाठी अंगणवाडी सेविकेच्या खात्यावर आर.टी.जी.एस. प्रणालीद्वारे निधी वर्ग करणेबाबत महाराष्ट्र बँकेस पत्र दिले होते, मात्र अद्याप सदरची रक्कम हस्तांतर झाली नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी थेट बँकेच्या शाखा अधिकाऱ्याशी चर्चा कली. तात्काळ रक्कम वर्ग करण्याचे आदेश दिले.

बैठकीच्या सुरवातीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेलकंदे यांनी दुषित पाणी नमुने, टीसीएल तपासणी याबाबत सविस्तर आढावा घेतला. शौचालय वापराबाबत प्रत्येक गावात जनजागृती करून हागणदारीमुक्त गावाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत व या कामात सातत्य ठेवण्याचे निर्देश दिले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. अपूर्ण घरकुल वेळेत पूर्ण करण्याचे आदेश डॉ. गिते यांनी दिले. सिंचन विहिर, विहीर पुनर्भरण, पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायतीतील जन सुविधेची कामे, घरकुल योजनाची अपूर्ण बांधकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी डॉ. गिते यांनी सर्व संबंधिताना दिले. आढावा बैठकीसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुनर्सर्व्हेक्षण केल्याबद्दल सत्कार
कुपोषणाबाबत आढावा सुरु असताना देवळा तालुक्यातील लोहणेर बीटाची माहिती घेताना खालप (ता.देवळा) येथे स्वत: पर्यवेक्षिकेने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने घरोघरी जाऊन पुनर्सर्वेक्षण करून आधीच्या सर्वेक्षणात सुटलेल्या बालकांची माहिती संकलित केल्याबद्दल डॉ. गिते यांनी अभिनंदन करून पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा सत्कार केला.

जिल्ह्यात शेवगा लागवडीची चळवळ
कुपोषण निर्मुलनासाठी शेवगा अतिशय उपयुक्त आहे. जिल्ह्यात शेवगा लागवडीची चळवळ सुरु असून नाशिक जिल्ह्यातून सुरु झालेली ही चळवळ राज्यभरात पोहचेल असा विश्वास डॉ गिते यांनी व्यक्त केला. कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास मदत म्हणून द्याने येथील ग्रामसेवक कापडणीस यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले २ पोते शेवगा बियाणे मोफत लागवडीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करत डॉ गिते यांनी व्यासपीठावरून उतरून कापडणीस यांचे जागेवर जावून त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे कौतिकपाडा येथील शेतकरी सुरेंद्र धोत्रे यांनी 7 किलो शेवग्याचे बियाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लागवडीसाठी सुपूर्द केले. सटाणा तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेकडून ५० किलो शेवगा बियाणे लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष  के.बी.इंगळे यांनी यावेळी सांगितले.

डॉ. गितेंकडून गावनिहाय योजनाची झाडाझडती
विविध योजनांबाबत डॉ गिते यांनी गावनिहाय आढावा घेतला. कुठली योजना अपूर्ण आहे, का अपूर्ण आहे असे प्रश्न विचारून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. घरकुल योजनेचा आढावा घेताना घरकुल कधी पूर्ण होतील याबाबत ग्रामसेवकांकडून लेखी लिहून घेण्यात आले, दिलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्यास जिल्हास्तरावर सुनावणी घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी दिले. तालुकास्तरीय यंत्रणेचा पहिल्यांदाच एकत्रित आढावा बैठक घेण्यात येत असल्यामुळे सर्व यंत्रणेची एकच तारांबळ उडाली  अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची त्रेधातीरपट उडाली.

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यातील ४ तालुके राज्यात पहिल्या दहामध्ये
प्रधानमंत्री आवास योजनेत गेल्या दोन महिन्यात नाशिक जिल्ह्याने देशात २२५ वरून १३२ क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्याच्या क्रमवारीत नाशिक जिल्ह्यातील तब्बल चार तालुके पहिल्या दहामध्ये असून नाशिक तालुका प्रथम, त्रंबक तालुका सहावा, दिंडोरी सातवा व कळवण तालुका आठव्या क्रमांकावर आहे. याबाबत डॉ गिते यांनी चारही तालुक्यांचे अभिनंदन करून देवळा व बागलाण तालुक्यानी जलदगतीने काम पूर्ण करण्याचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com